गोकर्णला नगरपंचायतीचा दर्जा द्या!
कुमठ्याचे आमदार दिनकर शेट्टी यांची मागणी
बेळगाव : कुमठा तालुक्यातील होन्नावर नगरपंचायतीचा दर्जा वाढवून नगरपालिकेचा दर्जा द्यावा, याबरोबरच इतिहास प्रसिद्ध गोकर्ण येथील ग्रामपंचायतीचा दर्जा वाढवून नगरपंचायत करावी, अशी मागणी कुमठ्याचे आमदार दिनकर शेट्टी यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. प्रश्नोत्तराच्या तासात त्यांनी ही मागणी केली. नगरप्रशासन मंत्री रहीम खान यांच्यामार्फत भैरती बसवराज यांनी विधानसभेत उत्तर दिले. होन्नावर नगरपंचायतीला नगरपालिकेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव राज्य सरकारपुढे नाही. लोकसंख्येच्या आधारावर स्थानिक स्वराज्य संस्थांचा दर्जा वाढवण्यात येतो. इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्यांनी 12 महानगरपालिकांना प्रत्येकी 200 कोटी रुपये निधी दिला आहे. 2 हजार 400 कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मात्र, लोकसंख्येनुसार नगरपालिका करण्याची तरतूद नाही. यासंबंधी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही भैरती बसवराज यांनी सांगितले. गोकर्णमध्ये दररोज 15 ते 20 हजार भाविक दर्शनासाठी येतात. त्यांना सुविधा पुरवण्यासाठी गोकर्ण ग्रामपंचायतीचा दर्जा वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. नगरपंचायत झाल्यास विकासासाठी जादा निधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्राधान्यक्रमाने होन्नावरला नगरपालिका व गोकर्णला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा, अशी मागणी दिनकर शेट्टी यांनी केली.