यमकनमर्डी मतदारसंघातील दोनशे शाळांच्या विकासासाठी अनुदान
मंत्री सतीश जारकीहोळी यांचे प्रतिपादन : भुतरामहट्टी येथील शाळेत कार्यक्रम
बेळगाव : उत्तमरितीने शिक्षण घेतल्यास चांगली नोकरी, पद मिळणे शक्य आहे. शिक्षणानेच विकास शक्य आहे. शिक्षणाला अधिक महत्त्व देऊन यमकनमर्डी मतदारसंघातील सुमारे 200 सरकारी शाळांच्या विकासासाठी अनुदान देण्यात आले असल्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. मतदारसंघातील भुतरामहट्टी येथील सरकारी माध्यमिक शाळेमध्ये जिल्हा पंचायत, जिल्हा शिक्षण- साक्षरता खात्यामार्फत मंगळवारी (दि. 25) झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. मतदारसंघातील जनता व विद्यार्थ्यांच्या अनेक दिवसांच्या मागणीची पूर्तता करण्यात आली आहे. तीन सरकारी माध्यमिक शाळा सुरू करण्यात आल्या असून तेथे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे.
स्वत:च्या गावात विद्यालय, महाविद्यालय उभारल्यास विद्यार्थ्यांना सोयीचे होणार आहे. सरकारने प्रत्येक ग्राम पंचायतीच्या कार्यक्षेत्रात माध्यमिक शाळा सुरू करावी. यमकनमर्डी मतदारसंघातील शाळांच्या विकासासाठी एकाच टप्प्यात 50 कोटींचे अनुदान मिळवून दिले आहे. मंत्री झाल्यानंतर दोन वर्षांच्या काळात 113 शाळांचा विकास करण्यात आला आहे. पुढील तीन वर्षांत 87 शाळांचा विकास करणार आहे. देशात 5 वर्षांच्या काळात 200 शाळांचा विकास घडवून आणणारा देशातील एकमेव मतदारसंघ यमकनमर्डी ठरणार आहे. हा मतदारसंघ शैक्षणिकदृष्ट्या आदर्श बनविणार असल्याचे मंत्री जारकीहोळी म्हणाले. त्यानंतर ग्राम पंचायत सदस्य बाळकृष्ण पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी अंजनेय यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित हेते.