रामकुमार जांग्रा किंडरगार्टनमध्ये आजी-आजोबा दिन
बेळगाव :
एम. व्ही. हेरवाडकर इंग्रजी माध्यम शाळेच्या रामकुमार जांग्रा किंडरगार्टनमध्ये आजी-आजोबा दिन साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुण्या म्हणून सतारवादक अरुंधती सुखटणकर उपस्थित होत्या. यावेळी त्या म्हणाल्या, नातवंडे म्हणजे दुधावरची साय आहेत. आयुष्याच्या संध्याकाळी आपली जबाबदारी संपली, असे वाटत असताना घरच्या ज्येष्ठांनी बाहेरून आलेल्या सुनेला सांभाळून घेऊन तिला आपलेसे करणे ही आपली जबाबदारी आहे. नातवंडांमुळे आपले घर गोकुळ बनते. त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देऊन त्यांना भविष्यासाठी तयार करणे हे आजी-आजोबांना शक्य आहे, असे सांगितले. या निमित्ताने विविध मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात आले. बालचमूंनी ईशस्तवन सादर केले. मृणाल चव्हाण हिने स्वागतगीत सादर केले. दुर्वा पवार हिने आजी-आजोबांचे महत्त्व सांगितले. माही चिटणीस व अनिष्का द•ाrकर यांनी गीते सादर केली. याप्रसंगी शाळेच्या व्यवस्थापन मंडळाचे दिलीप चिटणीस, प्रवीण पुजार, गायत्री गावडे, मुख्याध्यापिका शोभा कुलकर्णी, के. जी. विभागाच्या दीपा कामत व शिक्षक उपस्थित होते.