आजोबा काका करणार जंगल सफारीत धमाल...
फक्त ज्येष्ठांसाठी दाजीपूर जंगल ट्रेक : नाचणार, गाणार, फिरणार
कोल्हापूर / सुधाकर काशीद :
सावंत काकांचं वय ७७ आहे. तरुणपणात त्यांनी भरपूर डोंगर दऱ्या किल्ले जंगल पायाखालून घातले आहेत. अगदी ५५/६० वयापर्यंत ते जवळच्या जंगलात किल्ल्यावर वर्षातून एक दोनदा हमखास जायचे. आता ७७ वय आहे. शुगर आहे. अधून-मधून बोडा दमही लागतो. पण त्यांच्या मनातली उर्मी त्यांना गप्प बसू देत नाही, अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे त्यांनी काही दिवसांपूर्वी घरात बायको मुलासमोर मला विशाळगडला जायचे आहे. वाघाचे पाणी ते विशाळगड मी चालत जाणार आहे असा विषय काढला घरातल्यांनी त्यांचे शांतपणे ऐकून घेतले आणि या वयात असलं काही करू नका, असा दम वजा सल्ला देत घरात गप्प बसून राहायला सांगितले.
या सावंत काकांचं हे झालं एक उदाहरण, पण असे अनेक काका आहेत वयोमानानुसार ते घरात बसून आहेत. त्यांना घराबाहेर पडून जंगल समुद्र किल्ल्यावर मटकायचे आहे. खुल्या हवेचा मनसोक्त आनंद घ्यायचा आहे. पण त्यांच्या काळजीमुळे घरातले त्यांना बाहेर सोडत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अशा अनेक काकांचा विचार करून कोल्हापुरातील राजर्षि शाहू निवृत्त पोलीस असोसिएशनच्या वतीने फक्त वयोमानानुसार घरात बसून राहिलेल्या पण मनाने हौशी असलेल्या काकांसाठी दाजीपूर जंगल जीप ट्रेकचे आयोजन केले आहे.
ज्येष्ठ नागरिक वृद्धांनाही जंगल सफारीचा आनंद घेता यावा यासाठी खास हा ट्रेक आयोजित केला आहे, वय ७५ पर्यंत असू दे. शुगर बी. पी. ही असू दे. व्यवस्थित थोडे थोडे हळूहळू चालता येत असेल अशा सर्वाची काळजी घेत त्यांना या ट्रेकचा अनुभव मिळवून देण्यात येणार आहे. ज्येष्ठ सर्व काकांनी या ट्रेकमध्ये जंगलात तर फिरावेच पण रात्री तंबू समोरच्या पटांगणात धमाल करावी. नाचायची हौसही भागवून घ्यावी असे नियोजन केले गेले आहे. सत्र पंच्याहतर पावसाळे अनुभवलेल्या या ज्येष्ठांना या वयात आरोग्याची भीती घालत बसण्यापेक्षा त्यांना जमेल तेवढा आनंद घेऊ द्यावा हा या जंगल ट्रेक मागचा उद्देश आहे.
या अनोख्या मोहिमेसंदर्भात निवृत्त पोलीस असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय जाधव यांनी तरुण भारतशी बोलताना सांगितले की, वृद्धांना वयोमानानुसार घरात बसावे लागते. पण त्यांची बाहेर फिरण्याची, आनंद घेण्याची इच्छा कायम असते. त्यांच्या काळजीपोटी घरातले लोक त्यांना बाहेर सोडत नाहीत. पण आम्ही निवृत्त पोलीस त्यांची ट्रेकच्या काळात काळजी घेऊ. त्यांना उघड्या जीप मधून जंगलात फिरवून थोडेफार जंगलातून फिरण्याची ही संधी देऊ. रात्री तंबूत निवाऱ्याची चांगली सोय आहे. शाकाहारी-मांसाहारी जेवणाचा बेत आहे. तंबूसमोर शेकोटीच्या प्रकाशात काका धमाल नाचतील, अशी सोय करू. २८ ते ३० डिसेंबर म्हणजे एक दिवस एक रात्र असे या ट्रेकचे नियोजन आहे. फक्त वयोमानानुसार घरात, खुर्चीत, गॅलरीत, व्हरांड्यात बसून राहायची वेळ आलेल्या काकांनाच या मोहिमेत प्रवेश आहे. संपर्कसाठी निवृत्त पोलीस निरीक्षक संजय जाधव ८८०५००४४६० हा क्रमांक आहे