जिल्हा बँकेचे संचालक अरविंद पाटील यांची जल्लोषी मिरवणूक
वार्ताहर /नंदगड
बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी खानापूर तालुक्यातील अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल खानापूर तालुक्यातील जनतेच्यावतीने खानापूर शहरात भव्य मिरवणूक काढण्यात आली. सोमवारी सायंकाळी 6 वाजता बेळगावहून खानापूरला अरविंद पाटील यांचे आगमन झाले. यावेळी खानापूर येथील जांबोटी सर्कलजवळ फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. जेसीबीच्या सहाय्याने अरविंद पाटील यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली. गुलाल उधळून विजयोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील कृषी पत्तीनचे चेअरमन व संचालक, कर्मचारी, शेतकरी तसेच अरविंद पाटील यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर डॉल्बीच्या तालावर अनेकांनी ठेका धरत खानापूर शहरात मिरवणूक काढण्यात आली.
खुल्या वाहनातून अरविंद पाटील सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत होते. दरम्यान, फुलांचा वर्षाव केला जात होता. तर अनेकांनी पुष्पमाला घालून अभिनंदन केले. मिरवणूक दरम्यान अरविंद पाटील यांनी वाहनातून उतरून जगत ज्योती बसवेश्वर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळी अरविंद पाटील बोलताना म्हणाले, खानापूर तालुक्यातील जनतेने व कृषी पत्तीनच्या चेअरमन व संचालकांनी माझ्यावर विश्वास ठेवून माझी बिनविरोध निवड केली. त्याबद्दल अरविंद पाटील यांनी आभार मानले. जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून पाचव्यांदा निवड केल्याबद्दल समाधान व्यक्त केले. प्रत्येक वेळी पत वाढवून आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. यापुढेही तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला कृषी पत्तीन संघाच्या माध्यमातून झिरो टक्के दराने कर्जपुरवठा होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली.