‘अन्विता’ चित्रपटाच्या पोस्टरचे बेळगावात थाटात लाँचिंग
‘दडपण’चा कन्नड रिमेकही लवकरच : येत्या 5-6 रोजी ऑडिशन
बेळगाव : अस्मिता क्रिएशन्स, बेळगाव या चित्रपट निर्मिती संस्थेमार्फत ‘अन्विता’ व कन्नड भाषेत येणाऱ्या ‘दडपण’ या चित्रपटांच्या पोस्टरचे लाँचिंग रविवारी उत्तर कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष डॉ. शंकरराव सुगते यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचबरोबर ‘दडपण’ या मराठी चित्रपटाच्या कन्नड आवृत्तीचे पोस्टर लाँचिंग अॅड. अश्विनी नावगेकर यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत लेखक-दिग्दर्शक संतोष सुतार यांनी चित्रपटाबद्दल माहिती दिली. मागील वर्षी आलेल्या ‘दडपण’ या मराठी चित्रपटाला बेळगावच्या नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. स्थानिक कलाकारांनी अतिशय चांगल्या भूमिका केल्यामुळेच हा चित्रपट बरेच दिवस बेळगावमध्ये चालला. त्यामुळे समाज प्रबोधनासाठी नवीन विषय घेऊन प्रेक्षकांपर्यंत आलो आहे, असे त्यांनी सांगितले.
‘अन्विता’ हे देवीचेच एक नाव असून महिला अत्याचाराच्या घटना घडत असताना याविरोधात प्रत्येकाने आपल्या घरापासूनच कसा बदल घडवावा, याची माहिती देण्याचा प्रयत्न ‘अन्विता’ या चित्रपटातून दिला आहे. त्याचबरोबर मराठीतील ‘दडपण’ चित्रपट लवकरच कन्नड भाषेमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. ‘अन्विता’ या चित्रपटासाठी येत्या 5 व 6 ऑक्टोबरला बेळगावमध्ये ऑडिशन घेतल्या जाणार आहेत. यामध्ये जास्तीत जास्त कलाकारांनी ऑडिशन देऊन आपले नशीब आजमावावे. ‘अन्विता’ चित्रपटासाठी स्टारकास्ट घेतली जाणार असून यासाठी मुंबई येथेही प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अस्मिता क्रिएशन्सचे सर्वेसर्वा राजेश लोहार, कलाकार शशिकांत नाईक, निधी राऊळ, महादेव होनगेकर, प्रशांत शेबण्णावर, गायक सागर चंदगडकर, स्वाती सुतार, काजल धामणेकर, तेजस्विनी एस. के., प्रवीण सुतार, सुरेश मोने, अँथनी डिसिल्वा यासह इतर मंडळींचा सन्मान करण्यात आला.