आचरा येथे भव्य कंदिल स्पर्धा
सिरॉक ग्रुप व रंगभूमी गावातली तर्फे आयोजन
आचरा | प्रतिनिधी
आचरा पंचक्रोशी म्हणजेच चिंदर, त्रिंबक, वायंगणी आणि आचरावासीयांसाठी आपल्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता,आपली दीपावली अधिक आनंदी व प्रकाशमय करण्याकरिता आणि आपल्या गावालादेखील आनंदोत्सवाची सजावटीची पहिली आंघोळलाल घालण्याकरिता सिरॉक ग्रुप आचरा व रंगभूमी गावातली यांच्या संयुक्त विद्यमाने कंदिल स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी आकर्षक बक्षिसे ठवण्यात आली असून प्रथम क्रमांक रुपये ४००१/-, द्वितीय क्रमांक रुपये ३००१/-, तृतीय क्रमांक रुपये २००१/-, उत्तेजनार्थ प्रथम आणि उत्तेजनार्थ द्वितीय प्रत्येकी रुपये ५०० /-अशी राहणार आहेत.
दिनांक 14 नोव्हेंबर पर्यंत कंदिल तयार करून तो आपण आपल्या दाराबाहेरील रस्ता किंवा पाणंद किंवा पायवाट या ठिकाणी किमान १० ते १५ फूट उंची वर लावायचा असून कंदीलाची लांबी, रुंदी,उंची कमीत कमी दोन फूट असावी, तसेच त्यामध्ये विद्युत दिवा, (बल्ब) असणे आवश्यक आहे. संपूर्ण कंदील बनवण्याचा किंवा बनवताना चा व्हिडिओ बनवावा, परीक्षक किंवा आयोजक यांनी तो मागल्यास द्यावाच लागेल. अन्यथा आपला कंदील विचारात घेतला जाणार नाही. स्पर्धेमध्ये कुटुंब,फ्रेंड्स सर्कल बचत गट, वाडी मंडळ, महिला मंडळ म्हणजेच पंचक्रोशीतील कोणीही भाग घेऊ शकतात. स्पर्धेत सहभाग दर्शवण्यासाठी सी कॅफे आचरा, हॉटेल सिरॉक शेजारी येथे प्रवेशिका फॉर्म भरावायचा आहे.