भव्य दुर्गामाता दौडचे यावर्षीही आयोजन
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या बैठकीत निर्णय
बेळगाव : देव, देश आणि धर्मासाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे यावर्षीही भव्य दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. येत्या 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत ‘जय भवानी जय शिवाजी’चा गजर करत दौड यशस्वी केली जाणार आहे. धर्माचा प्रचार व प्रसार करणारे उत्तम वक्ते तसेच स्वराज्यातील मावळ्यांचे वंशज बेळगावला आणण्याचा निर्धार शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या बैठकीत करण्यात आला. सोमवारी झालेल्या बैठकीमध्ये दुर्गामाता दौडविषयी प्राथमिक चर्चा करण्यात आली. दुर्गादेवीचा जागर करत यावर्षीही अकरा दिवस दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत शहराच्या प्रत्येक विभागातून दौड निघणार आहे. सर्वात मोठी दुर्गामाता दौड बेळगावमध्ये काढली जात असल्याने नियोजनबद्ध पद्धतीने ती काढली जावी, यासाठी कार्यकर्त्यांनी विचार मांडले.
प्रारंभी कर्नाटक प्रांत प्रमुख किरण गावडे यांनी दुर्गामाता दौडचे आयोजन का करावे? तसेच या मागची संकल्पना काय? याची माहिती दिली. दौडचे विभागवार नियोजन येत्या चार दिवसात केले जाणार आहे. दरवर्षी धारकऱ्यांचा सहभाग वाढत असल्याने कोठेही बेशिस्तपणा जाणवू नये, यासाठी प्रमुख कार्यकर्त्यांची नेमणूक केली जाणार आहे. दररोज 25 ते 40 हजार शिवप्रेमी दुर्गामाता दौडमध्ये सहभागी होत असतात. यावेळी त्यांनी देव, देश, धर्म या व्यतिरिक्त इतर कोणत्याही घोषणा देऊ नयेत, अशा सूचना बैठकीदरम्यान करण्यात आल्या. यावेळी जिल्हा प्रमुख विश्वनाथ पाटील, शहर प्रमुख अनंत चौगुले, तालुका प्रमुख परशुराम कोकितकर, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, प्रचारक हिरामणी मुचंडीकर, विठ्ठल सोनपन्नावर, सिद्धार्थ पाटील यांनी विचार मांडले. यावेळी किरण बडवाण्णाचे, चंद्रशेखर चौगुले, विनायक कोकितकर यांच्यासह मोठ्या संख्येने धारकरी उपस्थित होते.