महायुतीचा ‘मिशन-48’ संकल्प यशस्वी करणार; शिवसेना राष्ट्रीय अधिवेशनात ठराव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अधिवेशनास प्रारंभ; लोकसभा निवडणुकीत राज्यातील सर्व जागा जिंकण्याचा निर्धार, नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या अभिनंदनासह सहा ठराव
कोल्हापूर प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने केलेला मिशन-48 संकल्प यशस्वी करण्याचा ठरावा शिवसेनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आला. तसेच लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील सर्व 48 जागा जिंकण्याचा निर्धार शिवसैनिकांनी केला. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या अभिनंदनासह सहा ठराव अधिवेशनात करण्यात आल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शिवसेनेच्या महाअधिवेशनास शुक्रवारी महासैनिक दरबार हॉल येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रारंभ झाला. अधिवेशनात सकाळी झालेल्या सत्रात सहा ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. यानंतर मंत्री उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत अधिवेशनातील ठरावांबाबत माहिती दिली.
मंत्री सामंत म्हणाले, अधिवेशनाच्या पहिल्या सत्रात 6 ठराव पारित करण्यात आले असून श्रीराम मंदिर उभारल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा पहिलाच ठराव करण्यात आला. देशाची प्रगती होण्यासाठी त्यांनी काम केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अभिनंदनाचा दुसरा ठराव पारित करण्यात आला. तिसरा ठराव देशाचे गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या संदर्भात होता काश्मीर बाबत 370 कलम रद्द संदर्भात घेतलेला निर्णय केंद्रशासित करण्याचा घेतलेला निर्णय तसेच महाराष्ट्रातल्या सहकार क्षेत्राला ऊर्जितावस्था आणण्यासाठी घेतलेले निर्णय यासाठी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव सुद्धा करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर महाराष्ट्राला ज्या नावीन्यपूर्ण योजना दिल्या, त्या योजना सर्वसामान्य घटकापर्यंत पोहचल्या आहेत. सर्वसामान्यांना त्याचा फायदा झालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अभिनंदनचा चौथा ठराव झाला. पाचवा ठराव हा राजकीय ठराव असून लोकसभेची निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती म्हणूनच आम्ही लढणार आहोत. राज्यातील सर्व जागा जिंकत मिशन 48 यशस्वी करण्याचा ठराव करण्यात आला. तर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेची सुरुवात केली त्या वेळेपासून शिवसेनेच्या वाढीसाठी त्यांच्यासोबत ज्या शिवसैनिकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले त्यांच्या नावाने शिवसन्मान पुरस्कार देण्याचा अंतिम ठराव करण्यात आला. शिवसेनेच्या वर्धापन दिनी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल.
यामध्ये शिवसेना नेते दत्ताजी साळवी यांच्या नावाने उत्कृष्ट कामगार पुरस्कार, सुधीर जोशी यांच्या नावाने नाविन्यपूर्ण उभारता उद्योजक पुरस्कार, प्रमोद नवलकर यांच्या नावाने उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार, दत्ता नलावडे यांच्या नावाने आदर्श शिवसैनिक पुरस्कार, दादा कोंडके यांच्या नावाने कला क्षेत्रातील उत्कृष्ट पुरस्कार, वामनराव महाडिक यांच्या नावाने शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार आणि शरद भाऊ आचार्य यांच्या नावाने उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देण्यात येणार असल्याचे मंत्री सामंत यांनी सांगितले.
जाहीर सभा बनली चावडी सभा
उद्धव ठाकरे यांच्यावर वैयक्तिक टिका करणार नाही. त्यांच्यावर टिका करायची झाल्यास प्रत्येक शिवसैनिकांच्या मनामध्ये खूप काही बोलण्यासारखे आहे. पण आम्ही संयम बाळगला आहे. जे शिवाजी पार्कमधून जाहीर सभा घ्यायचे त्यांना आज रस्त्यावर सभा घ्यावी लागत आहे. त्यांच्या काही दिवसांपुर्वी कोकणातील जाहीर सभेला लोक न जमल्याने केवळ दोनशे खुर्च्या मांडत चावडी सभा घेण्याची वेळ त्यांच्यावर आली. त्यामुळे त्यांच्यावर वैयक्तिक टिका आम्ही करणार नाही. जनताच त्यांना त्यांची जागा दाखवून देईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
सर्व्हेक्षणावर संशय म्हणजे मराठा आरक्षणाला विरोध
मराठा समाजाच्या सर्व्हेक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 307 कोटी रुपयांचा निधी दिला. घरोघरी जावून हा सर्वे तातडीने करण्यात आला आहे. सर्व्हेसाठी आयोगाचे लोक घरी आलेले सर्व जनतेला माहित आहे. त्यामुळे या सर्व्हेक्षणावर काँग्रेस संशय घेत असेल तर त्यांची भुमिका हि मराठा आरक्षणाला विरोध करणारीच आहे, असे म्हणावे लागेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. ओबीसी समाजावर कोणताही अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची आमची ठाम भुमिका असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.