महायुती सरकारचा आज शपथविधी शक्य
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार : एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा फॉर्म्युला कायम राहणार
मुंबई / प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या निवडणुकीत महायुतीने घवघवीत यश मिळवल्यानंतर आज महायुती नवीन सरकार स्थापन करण्याचा दावा करण्याच्या तयारीत आहे. उद्या (आज) शपथविधी सोहळा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती शिवसेनेचे (शिंदे गट) ज्येष्ठ मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
मुख्यमंत्री ठरविण्यासाठी भाजपाचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी रात्री उशीरा दिल्लीला रवाना होणार आहेत. यामध्ये भाजपा हायकमांडसोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या नावाची अंतिम घोषणा होणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर आज (सोमवार) मुंबईतील राजभवनात शपथविधी सोहळा साजरा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी जाहीर झाले. महायुतीने जोरदार मुसंडी मारत 236 जागांवर दणदणीत विजय मिळवला. निकालानंतर महायुतीमध्ये आता सरकार स्थापनेसाठी जोरदार हालचाली सुरू असून मंत्रिपदावऊन घोडे अडण्याची शक्यता आहे. आधीच्या सरकारप्रमाणेच एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री पुढच्या सरकारमध्येही असणार आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार, शपथविधी सोहळ्यात केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मात्र मंत्रिमंडळातील अन्य मंत्र्यांच्या नावांवर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. शिवाय युतीतील घटक पक्षांशी चर्चा केल्यानंतरच मुख्यमंत्रिपदासह अन्य मंत्रीपदांचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
मंत्रिमंडळाचा संभाव्यफॉर्म्युला :
महायुतीत संभाव्य मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली असून ती खालील प्रमाणे
- 6 ते 7 आमदारांच्या मागे एका मंत्रिपदाची शक्यता
-भाजपला 21 ते 22 मंत्रिपदे मिळण्याचा अंदाज
- शिवसेने शिंदे गटाच्या वाट्याला 10 ते 12 मंत्रिपदे
- अजित पवार गटास 8 ते 10 मंत्रिपदे मिळणार असल्याची माहिती
-अगोदरच्या सरकारमध्ये एक ही राज्यमंत्री नव्हता, मात्र नवीन सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून अनेकांची वर्णी लागणार
विधानसभेचा कार्यकाळ 26 रोजी होणार समाप्त
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता राज्यात युतीचे सरकार स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुतीकडून मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अद्याप जाहीर झालेला नाही. मात्र विधानसभेचा कार्यकाळ उद्या दि 26 नोव्हेंबररोजी संपणार आहे, त्यामुळे त्यापूर्वी सरकार स्थापन करावे लागेल. तसे न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल.
कोणताही वाद होणार नसल्याची खबरदारी
मुख्यमंत्र्यांबाबत कोणताही वाद होणार नाही. निवडणुकीनंतर तिन्ही पक्षांचे नेते मिळून निर्णय घेतील, हे पहिल्या दिवसापासून निश्चित झाले आहे. महायुतीने 288 पैकी 236 जागा जिंकून प्रचंड बहुमत मिळवले. भाजपने 132 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. फडणवीस यांच्या नेतफत्वाखाली काम करावे लागेल, असे म्हणत विरोधकांनी शिंदे यांच्यावर मुख्यमंत्रिपदावरून निशाणा साधला आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्रिपदासाठी बराच काळ संघर्ष सुरू आहे. 2019 मध्ये उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात सत्तावाटपावरून मतभेद झाल्याने भाजप आणि शिवसेनेची युती तुटली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. मात्र, 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्याविरोधात बंड करून त्यांच्यासोबत अनेक आमदारांना सोबत घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्याविरोधात बंड ठोकून शिंदे सरकारला पाठिंबा दिला आहे.