माजगाव ग्रामपंचायतीवर ग्रामविकास अधिकाऱ्याची नियुक्ती करा
पद नियुक्तीसाठी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आमरण उपोषण सुरू
ओटवणे | प्रतिनिधी
माजगाव सारख्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी हे पद गेल्या एक वर्षापासुन रिक्त आहे. याचा ग्रामपंचायतीच्या प्रशासकीय कामकाजासह गावाच्या विकास कामावरही परिणाम झाला आहे. याबाबत अनेक वेळा संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधून तसेच ओरोस येथे उपोषणही छेडूनही दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवार पासून माजगाव सरपंच डॉ अर्चना सावंत, उपसरपंच संतोष वजरे आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी आमरण उपोषण छेडले आहे.
रिक्त असलेले ग्रामविकास अधिकारी पद भरण्यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात येते मात्र केवळ आश्वासन पलीकडे कोणतीही कार्यवाही होत नाही. गेल्या मार्च महिन्यात रोज येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर उपोषण छेडण्यात आले होते त्यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दहा दिवसात ग्रामविकास अधिकारी देण्याचे लेखी आश्वासन दिले होते मात्र या आश्वासनाची अद्याप पूर्तता करण्यात आली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेसह कर्तव्यशून्य कारभाराबाबत माजगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे. त्यामुळे जोपर्यंत ग्राम विकास अधिकारी नियुक्त होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार माजगाव ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केला आहे.