ट्रॅक्टरचालकावर हल्ला करणाऱ्या वानराला पकडण्यात अखेर ग्रामपंचायतीला यश
ट्रॅक्टरचालकांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
सांबरा : हलगा येथे ट्रॅक्टरचालकावर हल्ला करणाऱ्या वानराला पकडण्यात अखेर ग्रामपंचायतीला यश मिळाले आहे. त्यामुळे ट्रॅक्टरचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. काही दिवसांपूर्वी एका वानराचे पिल्लू एका ट्रॅक्टरखाली सापडून ठार झाले. या घटनेचा त्या वानराला जबर धक्का बसला आणि ते वानर तेव्हापासून गावामध्ये कोणतीही ट्रॅक्टर दिसली की त्याच्यावर हल्ला करत आहे. जणू त्या घटनेचा प्रतिशोध घेण्यासाठीच वानर प्रत्येक ट्रॅक्टरचालकावर हल्ला करत आहे. यामुळे हलगा गावातून ट्रॅक्टर घेऊन जाताना ट्रॅक्टर चालकाना जीव मुठीत घेऊन जावे लागत होते..
त्यासाठी ग्रामपंचायतीने त्या वानराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. ग्रामपंचायतीने याची दखल घेऊन सदर वानराला पकडण्यासाठी मोहीम आखली व गुरुवार दि. 17 रोजी गणपत गल्ली येथे त्या वानराला पकडण्यात आले. वानराला पकडल्यामुळे ट्रॅक्टरचालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. गावामध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केलेल्या वानराला वेळीच पकडल्यामुळे ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचे आभार मानले आहेत. तसेच याबाबतची सविस्तर बातमी वृत्तपत्रांमध्ये दिल्याबद्दल ‘तरुण भारत’चेही ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.