For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धुवाधार पावसाने उडविली दाणादाण

06:55 AM Jun 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
धुवाधार पावसाने उडविली दाणादाण
Advertisement

रस्ते जलमय, अनेकांच्या घरात-दुकानांत शिरले पाणी, स्मार्ट सिटीच्या कामांची पोलखोल

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

शनिवार शहरासह उपनगरे आणि ग्रामीण भागाला पावसाने अक्षरश: झोडपले. मृग नक्षत्राने दाखविलेल्या रुद्रावतारामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. अनेक रस्त्यांवर तलावाचे स्वरूप निर्माण झाले. काही दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये पाणी शिरून साऱ्यांचीच तारांबळ पावसाने उडवून दिली. पावसाला इतका वेग होता की बघता बघता सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे दुचाकीस्वारांसह चारचाकीवाहकांचीही चांगलीच फजेती झाली. स्मार्ट सिटीच्या कामांचा दर्जा पुन्हा एकदा उघडकीस आला. यामुळे शहरवासियांतून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून वळिवाने शहरासह परिसराला झोडपून काढले होते. मान्सूनचे आगमन होण्याचे संकेत होते. हवामान खात्यानेही अशी शुभवार्ता दिली होती. शनिवारी सकाळपासून ढगाळ वातावरण असले तरी पाऊस पडेल, असे कोणाला वाटले नव्हते. मात्र दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. पाहता पाहता पावसाने रुद्रावतार धारण केले. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पहिल्याच दमदार मृग नक्षत्राने साऱ्यांची दैना उडविली. या पावसामुळे बाजारपेठेतील फेरीवाल्यांसह दुचाकीस्वार आणि पादचारी यांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत असताना बघताबघता सर्वत्र पाणीच पाणी झाले. त्यामुळे अनेकांना एकाच ठिकाणी दोन तासांहून अधिकवेळ ताटकळत थांबावे लागले.

शहरातील ग्लोब थिएटरसमोर तलावाचे स्वरूप निर्माण झाले होते. त्यामधून वाहने ये-जा करणे अवघड झाले. दुचाकीस्वारांना वाहने ढकलतच बाजूला न्यावी लागत होती. चारचाकी वाहने यामधून जाताना इतर वाहनांवर पाणी शिंथडत होते.  गोवावेस येथील सर्कलसह तेथील महानगरपालिकेच्या संकुलनामध्ये गुडघाभर पाणी साचून राहिले. त्यामुळे अनेकांच्या दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले. पाणी जाण्याला वाटच नसल्याने अक्षरश: व्यावसायिकांची चांगलीच भंबेरी उडाली होती. नेमके काय करायचे?, तसेच दुकानांतील साहित्य ठेवायचे कोठे? असा प्रश्न पडला. फोर्ट रोडवरही गंभीर परिस्थिती निर्माण झाली. जवळपास 2 फूट पाणी साचून होते. रस्त्यावरील पाणी दुकानात शिरत असल्यामुळे दुकानदारांनी ते पाणी बाहेर काढण्यासाठी धडपड सुरू केली. मात्र पाऊस थांबत नसल्याने त्यांची धडपड कुचकामी ठरली. यामुळे दुकानातील साहित्य भिजून नुकसान झाले.

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात गटारी, नाले, पदपथ, रस्ते, सायकल ट्रॅक, बसथांबे निर्माण करण्यात आले. मात्र नियोजनाचा अभाव आणि कामाचा निकृष्ट दर्जा यामुळे शहरवासियांना मोठा फटका बसू लागला आहे. रस्ते करताना योग्यप्रकारे करण्यात आले नाहीत. काही ठिकाणी रस्त्यावरच सखल भाग निर्माण झाला आहे. त्याठिकाणी पाणी साचून आहे. ग्लोब थिएटरसमोर गेल्या पाच ते सहा वर्षांपासून नेहमीच पाणी साचून राहते. मात्र पाण्याला वाट करून देण्यासाठी महानगरपालिकेने तसेच स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी काहीच प्रयत्न केले नाहीत. त्याचा फटका यावर्षीही बसला आहे.

गेल्या चार दिवसांपासून ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळत होता. मात्र शनिवारी ढगांचा आवाज न होताच दमदार सरी कोसळल्याने मान्सूनचे आगमन झाल्याचे दिसून आले. दोन ते अडीच तासांनंतर पावसाचा वेग कमी झाला तरी बराच उशीर पावसाची रिपरिप सुरूच होती. मुसळधार पावसामुळे गटारी तुडुंब भरून वाहत होत्या. अनेक गटारींमधील कचरा रस्त्यांवर आला होता. यामुळे पादचाऱ्यांना त्यामधून जाताना कसरत करावी लागत होती. महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीच्या नावाने अक्षरश: जनतेतून भरपावसातही शिमगा सुरू होता.

शहरातील कॉलेज रोड, गांधीनगर, कोतवाल गल्ली, भेंडीबाजार, रविवारपेठ, नरगुंदकर भावे चौक या परिसरात रस्त्यावरूनच पाणी वाहत होते. गटारी तुडुंब भरल्याने पाण्याला जाण्यासाठी पुढे वाटच नव्हती. त्यामुळे भाजीविक्रेते व इतर व्यावसायिकांचे साहित्यही या पावसातून वाहत होते. पावसाचा रुद्रावतार पाहून अनेकांनी आपले सर्व साहित्य घाईगडीत गुंडाळून काही संकुलनांमध्ये तसेच दुकानांमध्ये ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकानातही पाणी शिरल्याने शेवटी भाजीपाला व इतर साहित्य खराब झाले. पहिल्याच मान्सूनच्या जोरदार पावसाने साऱ्यांची दाणादाण उडविली.

शहराबरोबरच अनगोळ, शहापूर, वडगाव, आनंदनगर, खासबाग, वैभवनगर, महांतेशनगर, शाहूनगर, सदाशिवनगर परिसरातही दमदार पाऊस कोसळल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. अनगोळमधील मारुती गल्ली-मरगाई मंदिर परिसरात अक्षरश: गुडघाभर पाणी रस्त्यावरच साचून होते. यामुळे घर बांधण्यासाठी ठेवण्यात आलेली वाळू यासह इतर साहित्य पावसामुळे वाहून गेले.

चौगुलेवाडी येथील रहिवाशांना मोठा फटका

चौगुलेवाडी येथील रहिवाशांना दरवर्षीच पावसाळ्यात मोठा फटका बसत आहे. या परिसरातील पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान होत आहे. यावर्षीही पहिल्याच दमदार पावसाने साऱ्यांची तारांबळ उडविली आहे. मागील चार वर्षांपासून ही समस्या निर्माण झाली आहे. अधिक पाऊस झाला तर स्थलांतर करण्याची वेळ या नागरिकांवर येणार आहे. तेव्हा महानगरपालिका याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गटारी, नाले साफ नसल्याने मोठा फटका

पावसाळ्यापूर्वी गटारी व नाल्यांची सफाई करणे महत्त्वाचे होते. लहान गटारेंचे पाणी मोठ्या नाल्याला जाते. मात्र त्या नाल्यांमधूनच पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे गटारीतही पाणी साचून होते. याचबरोबर अनेक ठिकाणी गटारी व नाल्यांचे काम अर्धवट आहे. त्यामुळेही काहीजणांना त्याचा मोठा फटका बसला आहे. महानगरपालिकेने यापूर्वीच गटारी व नाल्यांची सफाई करून दुरुस्ती केली असती तर इतका फटका बसला नसता, अशा प्रतिक्रिया उमटत होत्या.

आनंदनगरमध्ये पुन्हा अनेकांच्या घरात पाणी

आनंदनगर येथील नाल्याचे काम अर्धवट झाले आहे. याचबरोबर येळ्ळूर रस्त्यावरही नव्याने मोठी गटार बांधण्यात आली. मात्र पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे या मोठ्या गटारीतून पाणी पुढे जाणे अवघड झाले आहे. परिणामी आनंदनगर पहिला व दुसरा क्रॉस येथील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे साऱ्यांचीच मोठी तारांबळ उडाली होती. पाण्याला इतका वेग होता की घरातून बाहेर पडणेही अवघड झाले.

तुरमुरी येथे 66 मि.मी. पावसाची नोंद

शनिवारी दुपारी दमदार पाऊस कोसळला. या पावसाची विविध ठिकाणी नोंद झाली आहे. पिरनवाडी येथील पर्जन्यमापक केंद्रामध्ये 65 मि.मी., सुळगा (हिं) येथे 65 मी.मी. तर तुरमुरी येथे 66 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र सांबरा येथील पर्जन्यमापक केंद्रामध्ये केवळ 3.3. मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे शहराच्या पूर्व भागामध्ये पाऊस कमी झाला आहे.

Advertisement
Tags :

.