पूर्व भागामध्ये कडधान्य पेरणी जोमात
शेतकरी वर्ग सुगी कामात मग्न : मळणीचीही धांदल : मात्र, ढगाळ वातावरणामुळे चिंतेत वाढ
वार्ताहर/सांबरा
तालुक्याच्या पूर्व भागामध्ये कडधान्य पेरणीची कामे जोरात सुरू असून, बैलजोडी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने कडधान्य पेरणी करण्यात येत आहे. भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे. मळणीची कामेही सुरू आहेत. त्यामुळे शिवारात शेतकरी वर्ग सुगी कामात मग्न असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. पूर्व भागातील बसवण कुडची, निलजी, शिंदोळी, बसरीकट्टी, मुतगे, सांबरा, बाळेकुंद्री खुर्द, होनिहाळ, पंत बाळेकुंद्री, मोदगा, कणबर्गी, कलखांब, मुचंडी, चंदगड, अष्टे, खनगाव, सुळेभावी आदी भागांमध्ये सध्या कडधान्य पेरणीची एकच धांदल उडाली आहे.
यंदा झालेल्या अति पावसामुळे अजून जमिनीत बराच ओलावा असल्याने कडधान्य पेरणीला काहीसा उशीर झाला. सध्या जमिनीतील ओलावा कमी होत असल्याने कडधान्य पेरणीसाठी हंगाम चांगले आहे. त्यामुळे सर्वत्र कडधान्य पेरणी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. बैलजोडी व ट्रॅक्टरच्या साहाय्याने कडधान्य पेरणी करण्यात येत आहे. सध्या बैलजोड्यांचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. बैलांची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे. त्यामुळे सर्रास ट्रॅक्टरने पेरणी करत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अजून निम्म्याहून जास्त शिवार कडधान्य पेरणीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे लवकर कडधान्य पेरणी करण्यासाठी शेतकरी वर्गाची धडपड सुरू आहे.
भात कापणी अंतिम टप्प्यात
या भागातील भात कापणी अंतिम टप्प्यात आली आहे.अजून जमिनीत ओलावा असल्याने व मजुरांच्या कमतरतेमुळे या भागातील भात कापणी लांबली होती. प्रसंगी परगावच्या मजुरांना घेऊन कापणी उरकून घेत आहेत. सध्या कापणी अंतिम टप्प्यात आली असून, पुढील आठ दिवसात भात कापणी संपणार असल्याचा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
‘भात मळणीही जोरात’
या भागामध्ये भात मळणीची कामे ही जोरात सुरू आहेत. ट्रॅक्टरच्या साहाय्याने भात मळणी करण्यात येत आहे. काही ठिकाणी यंत्रांचा वापर करून मळणी करण्यात येत आहे. सध्या कडधान्य पेरणी, भात कापणी व मळणी आदी कामामुळे शिवार फुलून गेल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.