पक्ष्यांसाठी धान्य-पाणी ठेवा उपक्रम
जायंट्स मेनतर्फे मातीची भांडी वाटप
बेळगाव : उन्हाळ्याची तीव्रता जाणवू लागल्याने पशु-पक्ष्यांना त्याचा त्रास होत आहे. अनेक पक्षी यामुळे तहानेने व्याकुळ होत आहेत. त्यांचे हाल होऊ नयेत म्हणून नागरिकांनी आपापल्या घराच्या छतावर, परसबागेत, बाल्कनीमध्ये पाणी आणि धान्य ठेवावे, असे आवाहन जायंट्स मेनचे अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांनी केले. बॉक्साईट रोडवरील ग्रीन गार्डनमध्ये जनजागृती कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. प्रास्ताविक आणि स्वागत करताना सचिव मुकुंद महागावकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. यानंतर मदन बामणे यांनी बोलताना खेडोपाड्यात तलाव, विहिरी, पाण्याची डबकी अथवा उघड्यावर पाणी मुबलक प्रमाणात असते.
पण शहरी भागात काँक्रिटीकरण झाल्याने उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यासाठी प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गार्डनमध्ये फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मातीच्या भांड्यांचे वाटप करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक केले. काही जणांनी स्वत: पाणी ठेवत असल्याचे सांगून प्रत्येकाने याचे अनुकरण करावे, असेही सांगितले. मातीची भांडी वाटप कार्यक्रमप्रसंगी खजिनदार मधू बेळगावकर, फेडरेशन संचालक संजय पाटील, फेडरेशन संचालक सुनील मुतगेकर, विनोद आंबेवाडीकर, राहुल बेलवलकर, सुनील मुरकुटे, सुनील पवार, आनंद कुलकर्णी, प्रदीप चव्हाण, वाय. एन. पाटील, पुंडलिक पावशे, धनराज जाधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.