For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रिवण आयआयटीसाठी सरकार गतिमान

12:23 PM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
रिवण आयआयटीसाठी सरकार गतिमान
Advertisement

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती : लवकरच केंद्राला पाठवणार जमिनीचा प्रस्ताव

Advertisement

पणजी : राज्यात आयआयटी शिक्षण संस्था उभारली जावी, यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. परंतु लोकांच्या विरोधामुळे गेल्या चार वर्षांत सरकारला यश आलेले नाही. परंतु आता सरकारने गतिमान पावले टाकण्यास सुरवात केली आहे. सांगे तालुक्यातील रिवण येथे आयआयटीसाठी चाचपणी करण्यात आलेल्या जागेबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे येत्या नवीन वर्षांत पाठविण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. दै. ‘तऊण भारत’शी बोलताना मुख्यमंत्री सावंत म्हणाले, राज्यात आयआयटी क्षेत्र विस्तारले जावे यासाठी सरकारकडून जमिनीचा शोध घेण्यात येत होता. सुरुवातीला सत्तरी तालुक्यातील शेळ-मेळावली येथील जनतेने तीव्र विरोध केल्यामुळे या प्रकल्पास उशीर झाला. परंतु आता हा प्रकल्प पूर्णत्वास यावा यासाठी सांगे तालुक्यातील रिवण येथील जागेचा सरकारने शोध घेतलेला आहे. सरकारने आयआयटी कॅम्पससाठी चाचपणी केलेल्या जमिनीचा प्रस्ताव लवकरच केंद्राकडे सुपूर्द केला जाईल. आयआयटी प्रकल्पाला लोकांचा तीव्र विरोध झाला, याचे कारण म्हणजे राज्यातील लोक जमिनीबाबत अतिसंवेदनशील आहेत. त्यातच काही लोक कोणत्याही सरकारी प्रकल्पांवर आक्षेप घेत असतात आणि त्यामुळे लोकोपयोगी प्रकल्प होण्यास उशीर होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सकारात्मक भावनेतून सहकार्य करा

Advertisement

राज्याचा विकास व्हायचा असेल तर सरकारचे चांगले काम व चांगले प्रकल्प यासाठी लोकांनी सहकार्य करायला हवे. राज्यात काहीजण विविध प्रकल्पांना विरोध  करण्याचा प्रयत्न करतात. परंतु यातून गोव्याचेच नुकसान होणार आहे. गोव्याला उपयुक्त ठरतील, लोकांचे कल्याण होईल, असे प्रकल्प साकारण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. त्यामुळे लोकांनी समजून घेऊन सकारात्मक भावनेतून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले.

Advertisement
Tags :

.