For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गोविंद गावडेंची होणार हकालपट्टी

01:15 PM May 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
गोविंद गावडेंची होणार हकालपट्टी
Advertisement

मुख्यमंत्र्यांसह पक्षश्रेष्ठींकडून बेताल वक्तव्यांची गंभीर दखल : गावडेंनी मुख्यमंत्र्यांसह आदिवासी खात्यावर केली होती टीका

Advertisement

पणजी : कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात रविवारी फोंडा येथे जाहीर कार्यक्रमात केलेल्या जहरी टीकेचे तीव्र पडसाद उमटले आहे. त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची जोरदार मागणी भाजपच्या काही मंत्र्यांनी तसेच खासदार आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी देखील केली आहे. तसेच या प्रकरणाचा सारा अहवाल दिल्लीत पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविण्यात आला आहे. अखेर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याविऊद्ध कारवाई केली जाईल, असे निवेदन केले. त्यामुळे आता मंत्री गोविंद गावडे यांच्यावर मंत्रीपदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव वाढणार आहे.

डॉ. प्रमोद सावंत मंत्रिमंडळातील वादग्रस्त ठरलेले गोविंद गावडे यांनी प्रथमच सरकार विरोधात टीका केलेली नाही, तर गेल्यावर्षी देखील अशाच एका सार्वजनिक कार्यक्रमात सरकारच्या विरोधात जोरदार टीका केली होती. त्यावेळी देखील त्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यासाठी पक्षात जोरदार मागणी करण्यात आली होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी त्यांना माफ केले होते. या अगोदर देखील त्यांनी सरकारवर जेव्हा टीका केली होती, त्यावेळी विद्यमान खासदार व तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी मंत्री गावडे यांना कडक शब्दात समज दिली होती. मुख्यमंत्र्यांना त्यांनी अशा मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवू नका अशी सूचना केली होती. आतापर्यंत अनेकवेळा मंत्री गावडे यांना पक्षाने तसेच मुख्यमंत्र्यांनी माफ केले होते.

Advertisement

मंत्र्यांना काढून टाकण्याची सूचना 

मात्र यावेळी रविवार 25 मे रोजी मंत्री गावडे यांनी फोंडा येथील जाहीर समारंभामध्ये मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करून सरकारच्या कारभाराचे वाभाडेच बाहेर काढले. यामुळे संतप्त झालेल्या काही मंत्री व आमदारांनी त्याचबरोबर खासदार सदानंद शेट तानावडे यांनी रविवारी सायंकाळी उशिरा मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे आता सर्व काही सहन होण्याच्या पलीकडचे आहे, तेव्हा त्वरित कडक कारवाई करा, अशी सूचना केली आहे.

अहवाल पोहोचला दिल्लीत

प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक हे शनिवारी नाशिकला रवाना झाले होते. रविवारी त्यांना हे वृत्त समजताच त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांना संबंधित मंत्र्याला काढून टाका अशी सूचना केली. तसेच हे संपूर्ण प्रकरण सोमवारी पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचले. विविध प्रसार माध्यमात प्रसिद्ध झालेली वृत्ते तसेच त्यांनी केलेल्या निवेदनाच्या चित्रफिती देखील पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचल्या. त्यानंतर दिवसभरात जोरदार हालचाली सुरू झाल्या.

मंत्री गावडेंवर होणार कारवाई

सायंकाळी उशिरा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषद बोलविल्यानंतर अनेकांना वाटले की मंत्री गोविंद गावडे यांच्यावर कारवाई झाली असावी परंतु मुख्यमंत्री आणि वेगळेच विषय पत्रकार परिषदेत सांगितले. नंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी “बेताल वक्तव्य करणाऱ्या जबाबदार व्यक्तींनी असे वागू नये आणि मंत्री गोविंद गावडे यांनी जे काही निवेदन केले ते अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे आता कारवाई होईल, असे स्पष्ट केले. आजवर जेव्हा मंत्री गोविंद गावडे यांनी सरकार विरोधात निवेदने केली होती, त्या त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना पाठीशी घातले होते. मात्र पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली याचा अर्थ आता मंत्री गोविंद गावडे यांचे मंत्रीपद धोक्यात आलेले आहे कदाचित आज सायंकाळपर्यंत गावडे यांच्या विरोधात कारवाई होऊ शकते असा अंदाज आहे. प्राप्त माहितीनुसार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे रात्री उशिरा पक्षश्रेष्ठींशी बोलणी करणार असून त्यानंतर ते एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहेत.

गोविंद गावडेंना हटविण्यास पक्षश्रेष्ठींची मान्यता

दरम्यान, रात्री उशिरा नवी दिल्लीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री डॉ. सावंत यांना पक्षश्रेष्ठींनी गोविंद गावडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार आज व उद्या मंत्री गावडे यांना राजीनामा देण्याची सूचना केली जाईल. त्यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना मंत्रिमंडळातून वगळले जाईल. त्यानंतर लागलीच मंत्रिमंडळाची फेररचना केली जाणार असून दिगंबर कामत व सभापती रमेश तवडकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, असा अंदाज आहे. त्यासाठी आणखी एका मंत्र्याला वगळावे लागणार आहे.

मंत्र्यांचा बेजबाबदारपण खपवून घेणार नाही : दामू नाईक 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मंत्री गोविंद गावडे यांचा पक्षाविऊद्धचा बेजबाबदारपणा यापुढे खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला आहे.  मंत्री गावडे यांना जर कोणताही वाईट अनुभव आला असेल तर त्यांनी मुख्यमंत्री किंवा पक्षप्रमुखांकडे चर्चा करायला हवी होती. परंतु ते भाजप पक्षातील शिस्तीचा भंग करीत असून बेताल व्यक्तव्य करीत आहेत. हा बेजबाबदारपणा चालणार नसून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिला आहे.

मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची गरज होती : रमेश तवडकर

आदिवासी कल्याण खात्यासंदर्भात आरोप करण्यापूर्वी मंत्री गोविंद गावडे यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे चर्चा करण्याची गरज होती, अशी प्रतिक्रीया सभापती रमेश तवडकर यांनी दिली आहे. गावडे हे मंत्री असल्यामुळे आपण अधिक काही बोलू शकत नाही. गावडे ज्यावेळी त्या खात्याचे मंत्री होते तेव्हा त्यांनी खात्यामध्ये विशेष काय भर घातली? याची माहिती नाही, असेही तवडकर म्हणाले.

गोविंद गावडेंच्या आरोपांशी माझा काही संबंध नाही : रोहन खंवटे

मंत्री गोविंद गावडेंच्या आरोपांशी आपला काही संबंध नाही, त्यामुळे आपण त्यावर काहीच बोलू शकत नाही असे निवेदन पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी केले. आपण सरकारमध्ये सामील असलो तरी आरोपांशी आपला थेट संबंध येत नाही. ज्यांनी आरोप केले ते गावडे देखील सरकारमध्ये आहेत. त्यांनाच त्या प्रकरणाची अधिक माहिती असल्याची शक्यता आहे असे खंवटे म्हणाले.

भाजप सरकारकडून प्रत्येक खात्यात भ्रष्टाचाराला प्रोत्साहन : विजय सरदेसाई

गोवा सरकारचा भ्रष्टाचार इतका संस्थात्मक झाला आहे की, सरकारही आता त्यात कोसळू लागले आहे, कंत्राटदारांना फायली हातावेगळ्या करण्यासाठी लाच द्यावी लागते हे मंत्री गोविंद गावडे यांचे विधान हे त्यांच्याच सरकारबद्दलच्या तीव्र निराशेचे लक्षण आहे. एक अंतर्गत गोटातील व्यक्ती म्हणून त्यांना हे माहीत असले पाहिजे की, भाजप सरकारने त्यांच्या प्रत्येक खात्यात भ्रष्टाचार किती धोकादायक प्रमाणात वाढवला आहे आणि त्याला प्रोत्साहन दिले आहे, अशी टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. प्रत्येक गोमंतकीयाला हे माहीत आहे की, गेल्या काही वर्षांत आपण छोटे-मोठे घोटाळे उघड केले आहेत, ज्यांनी गोव्याला अपरिवर्तनीय विनाशाच्या मार्गावर नेले आहे. गावडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या मंत्रालयाचा उल्लेख केल्यापासून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून कठोर कारवाईची वाट गोमंतकीय पाहत आहेत. तसे होईल की, मंत्रिमंडळ एकत्रितपणे ‘गोव्याने पाहिलेले सर्वांत भ्रष्ट सरकार’ ही पदवी मिरविण्यात धन्यता मानेल, असा उपहासात्मक सवाल गोवा सरदेसाई यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.