विणकरांचे थकीत वीजबिल सरकारनेच भरावे
मागण्यांसाठी विणकर सेवा संघाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
बेळगाव : विणकरांना वीजबिल भरता आले नसल्याने हे बिल थकीत आहे. सरकारच्या विलंबामुळेच विणकरांचे बिल थकले असल्याने हे बिल सरकारनेच भरावे, या प्रमुख मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय विणकर सेवा संघाच्यावतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. 1 एप्रिल 2023 पासून विणकरांचे वीजबिल थकीत आहे. हे थकीत बिल भरण्यासाठी वीज वितरण कंपन्यांकडून तगादा लावला जात आहे. यामध्ये निपाणी, चिकोडीसह जिल्ह्यातील इतर भागातील विणकरांचा समावेश आहे. राज्य सरकारने निर्णय घेण्यास विलंब केल्यामुळे बिल थकले असून हे बिल सरकारने भरावे. जर सरकारने भरले नाही तर पूर्वीप्रमाणेच 30 एचपी वीजपुरवठ्याला 1 रुपये 30 पैसे दराने आकारणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
मागण्या मान्य न केल्यास 13 ऑक्टोबर रोजी आंदोलन
याचबरोबर बेळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांमध्ये 52 लोकांच्या आत्महत्या झाल्या आहेत. परंतु, वस्त्राद्योगमंत्र्यांनी अद्याप त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली नसून त्यांचे सांत्वनही केले नाही. याबरोबरच 2024-25 वर्षामध्ये वस्त्राsद्योगासाठी पंचवार्षिक योजना तयार केली जात असून, त्यामध्ये विणकरांचा विचार व्हावा, आत्महत्याग्रस्त विणकरांना कर्जमाफी द्यावी, अशी मागणी करण्यात आली. मागण्या मान्य न केल्यास 13 ऑक्टोबर रोजी बागलकोट येथील बनहट्टी येथून बेळगावमार्गे हुबळीपर्यंत पदयात्रा काढली जाणार असून, तेथे भव्य आंदोलन केले जाणार असल्याचे अध्यक्ष शिवलिंग टिरकी यांनी सांगितले.