कीर्तनकार-वारकऱ्यांना सरकारने मानधन द्यावे
मुख्यमंत्र्यांना भेटणार : अॅड ईश्वर घाडी यांची माहिती
वार्ताहर/नंदगड
खानापूर तालुक्यातील कीर्तनकारांना प्रत्येकी दहा हजार व वारकरी यांना दोन हजार रुपये मानधन सरकारने द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे करण्यात येणार असल्याची माहिती खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी यांनी पत्रकारांशी बोलताना नंदगड येथे दिली. खानापूर तालुक्यामधील तरुणांना नोकरी, धंद्याबरोबरच त्यांचे भावी जीवन सुखमय व समाधानी जाण्यासाठी कीर्तनकारांनी अनेकांना वारकरी संप्रदायात आणले. त्यामुळे गेल्या दहा वर्षात वारकरी सांप्रदाय झपाट्याने वाढला. समाजहिताच्या दृष्टिकोनातून ही चांगली बाब आहे. खानापूर तालुक्यातील कीर्तनकार, प्रवचनकार व वारकरी मंडळी यासाठी कारणीभूत आहेत. एवढेच नव्हे तर खानापूर तालुक्यामध्ये महिला वारकऱ्यांची संख्या वाखाणण्याजोगी आहे. या साऱ्या गोष्टींचा विचार करून खानापूर तालुका ब्लॉक काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कीर्तनकार व प्रवचनकार यांना प्रत्येकी मासीक दहा हजार व वारकऱ्यांना दोन हजार मानधन मिळणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी बेंगळूर मुक्कामी जाऊन मुख्यमंत्र्यांना कीर्तनकारांच्या कार्याचे महत्त्व पटवून देऊन मानधनासाठी निवेदन देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर, ज्येष्ठ नेते राजेश पाटील होते.