जय किसान भाजीमार्केट वाचवण्यासाठी सरकारनियुक्त व्यवस्थापक नेमा
व्यापाऱ्यांची सहकार खात्याकडे निवेदनाद्वारे मागणी
बेळगाव : जय किसान भाजीमार्केट येथील संचालक मंडळाचा मनमानी कारभार सुरू आहे. नियमांचे उल्लंघन करत काही संचालकांनी दोन ते तीन दुकानगाळे घेतले आहेत. दुकानगाळ्यांचे वाटप करताना ज्येष्ठ सदस्यांवर अन्याय करण्यात आला आहे. त्यामुळे जय किसान भाजीमार्केट वाचवण्यासाठी या ठिकाणी सरकारनियुक्त व्यवस्थापकांची नेमणूक करावी, अशी मागणी जय किसान भाजीमार्केटमधील काही व्यापाऱ्यांनी सहकार खात्याचे उपनिबंधकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
दुकानगाळ्यांचे चुकीच्या पद्धतीने वाटप
शुक्रवारी काही व्यापाऱ्यांनी सहकार खात्याच्या कार्यालयात जाऊन आपल्या मागण्यांचे निवेदन अधिकाऱ्यांना सादर केले आहे. जमीन खरेदी व नवीन बाजाराच्या बांधकामासाठी जुन्या बाजारातील कमिशन एजंट (दलाल) यांनी 2007 पासून पैसे भरले आहेत. विलंब झाल्याने अतिरिक्त व्याज तसेच दंड आकारणीदेखील व्यापाऱ्यांकडून करण्यात आली. जय किसान भाजीमार्केट उभे राहिल्यानंतर दुकानगाळे चुकीच्या पद्धतीने वाटप करण्यात आले असून, आठ ते दहा सदस्यांना अडगळीचे गाळे देण्यात आले आहेत.
स्वयंघोषित संचालकांचा मनमानी कारभार
स्वयंघोषित संचालकांनी मनमानी कारभार करत नियम डावलून दोन दुकानगाळे घेतले आहेत. कँटीन भाडे, घटप्रभा लाईनचे भाडे सर्व संचालकांच्या खिशात जात आहे.पूर्वीच्या तक्रारीनुसार निवृत्त उपनिबंधक शृंगेरी हे चौकशीसाठी आले असता त्यांना कामकाजाची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे सरकारने या ठिकाणी व्यवस्थापक नेमावा व शेतकऱ्यांचे भाजी मार्केट वाचवावे, अशी मागणी निवेदनाद्वारे काही व्यापाऱ्यांनी केली आहे.
वैयक्तिक लाभासाठी बदनामी
जय किसान भाजीमार्केटमध्ये एकूण 265 सभासद आहेत. यापैकी 10 जणांनी वैयक्तिक लाभासाठी भाजीमार्केटची बदनामी सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करून दुकानगाळे भाड्याने देण्यात आल्याने त्यांना जाब विचारण्यात आला. यामुळे त्यांच्याकडून बदनामीचे सत्र सुरू आहे. याबद्दल उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे. जय किसान भाजीमार्केटमध्ये सर्व व्यवहार पारदर्शक पद्धतीने सुरू असून याची माहिती बेंगळूर येथील सहकार खात्याला वोळोवेळी दिली आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही संभ्रमात न पडता व्यापार सुरू ठेवावा.
- मोहन मन्नोळकर, उपाध्यक्ष जय किसान भाजीमार्केट