शेतकऱ्यांना दिलेल्या नोटिसा मागे घेण्याचे सरकारी आदेश
राज्यातील वक्फ मालमत्तेचा वाद : नोटिसा बजावताना आढळल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात वक्फ मालमत्तेचा वाद उफाळून निघाल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शेतकऱ्यांना आणि इतरांना दिलेल्या नोटिसा तात्काळ मागे घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्यानुसार रविवारी अधिकृत सरकारी आदेश बाहेर पडला आहे. अनेक शेतकरी आणि इतर लोकांनी आपली मालमत्ता वक्फ बोर्डाच्या नावावर नोंदवण्यात आली आहे, अशी तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी फेरफार प्रक्रिया आणि शेतकऱ्यांना बजावलेल्या नोटिसा मागे घेण्याचे निर्देश दिले आहेत.
शेतकऱ्यांच्या उताऱ्यातील जमिनीच्या बदलाबाबत यापूर्वीच बजावलेल्या नोटिसा तात्काळ मागे घ्याव्यात. तसेच शेतकऱ्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनींना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये. बेकायदेशीररित्या आणि नोटीस न देता उताऱ्यात कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केल्यास ती तत्काळ रद्द करा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी दिल्या होत्या. आता अधिकृत आदेश निघाला आहे.
शेतकऱ्यांच्या जमिनीवरून सुरू झालेला हा वक्फ मालमत्तेचा वाद कालांतराने मठ आणि हिंदू मंदिरांना नोटिसा बजावण्यापर्यंत आला होता. त्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांनी राज्यभर निदर्शने करून राज्य सरकारविरोधात आक्रोश व्यक्त केला होता. त्यावरून प्रशासन आणि विरोधक असा जोरदार वाद निर्माण झाला होता. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना दिलेली नोटीस अधिकृतपणे मागे घेतली आहे.
फेरफार प्रक्रिया थांबली पाहिजे. यासंदर्भात बजावण्यात आलेल्या नोटिसा मागे घ्याव्या. या जमिनीवर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेशात म्हटले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतरही कोणताही अधिकारी शेतकऱ्यांना नोटिसा बजावताना आढळल्यास अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.