कंग्राळी बुद्रुकमधील जलजीवन योजनेची शासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी
योजना लवकर पूर्ण करण्याची कंत्राटदाराला सूचना : वेळेत कामाची पूर्तता न झाल्यास कारवाईचा इशारा
वार्ताहर/कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. कार्यक्षेत्रात अडीच वर्षांपासून सुरू असलेली घरोघरी शुद्ध नळपाणी मिळणारी जलजीवन योजना अजून अपूर्णच आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर किरण घोरपडे, सहाय्यक अभियंता डी. एम. बन्नूर, मेहबूब कमानगार आदींनी मंगळवारी धावती भेट देवून पाहणी केली. लवकरात लवकर योजना पूर्ण करून नागरिकांना शुद्ध पाणी देण्याची कल्पना कंत्राटदाराला सांगून जर वेळेत कामाची पूर्तता न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला. यावेळी साई कॉलनी, पार्वतीनरमधील नागरिकांनी सदर काम सुरू असताना पाईपलाईन घालण्यासाठी रस्त्याची खोदाई करताना तांत्रिकदृष्ट्या मशिनने खोदाई केल्यास पेव्हर्स बसवून तयार केलेले रस्ते खराब होणार नाहीत. तसेच शासनाचा निधीही वाया जाणार नाही, याची कल्पना उपस्थित अधिकारीवर्गाला नागरिकांनी आपल्या मागणीतून केली.
कंग्राळी बुद्रुक गावाला केंद्र सरकारच्या योजनेतून सदर योजनेसाठी 8 कोटी 50 लाख रुपये निधी मंजूर झाले आहेत. सदर योजनेतून गावातील सर्व वॉर्डातील नागरिकांना घरोघरी दररोज शुद्ध व ताजे पाणी मिळणे हा शासनाचा उद्देश आहे. परंतु अडीच वर्षे झाली या योजनेचे काम पूर्ण झालेले नसून नागरिकांना दररोज शुद्ध पाणी कधी मिळणा? यासाठी मंगळवारी पाहणी करण्यासाठी आलेले वरिष्ठ अभियंते व अधिकाऱ्यांना नागरिकांनी जाब विचारला. योजनेचे सुरू असलेले मंदगतीचे काम कधी पूर्ण होणार, असा सवाल केला. यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा रोहिणी नाथबुवा, सदस्य दादासाहेब भदरगडे, जयराम पाटील, अनिल पावशे यांनीही सदर योजना अगदी मंदगतीने सुरू असून एप्रिल 2026 मध्ये होणाऱ्या लक्ष्मीदेवी यात्रेपूर्वी जलजीवन योजनेचे काम पूर्ण करून भाविकांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. गावातील काही गल्ल्यांमधील काम पूर्ण झालेले आहे. काही गल्ल्यांमधील बाकी आहे. तेंव्हा सर्व वॉर्डातील नळजोडणी कामे पूर्ण करून नागरिकांना रोज ताजे व शुद्ध पाणी मिळणे गरजेचे असल्याचेही मत अधिकाऱ्यांसमोर उपस्थित अध्यक्ष व सदस्यांनी व्यक्त केले.