कारवार जिल्ह्यात मंगळवारी शासकीय सुटी
गणेशोत्सवाच्या सजावटीचे साहित्य, फुले, फळे खरेदीसाठी बाजारात गर्दी
कारवार : गणेशोत्सवाची सुटी सोमवारी की मंगळवारी. गणेशोत्सव सोमवारी की मंगळवारी या वादावरुन निर्माण झालेल्या वादाला फाटा देत कारवार तालुक्यासह संपूर्ण जिल्हा गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. यावर्षी गणेशोत्सवाची सुटी सरकारने सोमवारी जाहीर केली होती. तथापि कारवार जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेने मंगळवारी सुटी जाहीर करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. कारवारचे आमदार सतीश सैल यांनीही मंगळवारी सुटी देण्याची सरकारकडे शिफारस करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. शेवटी जिल्हाधिकारी गंगुबाई यांनी मंगळवारी सुटी जाहीर केली आहे. तत्पूर्वीच जिल्ह्यातील काही शैक्षणिक संस्थांनी सोमवारपासून बुधवारपर्यंत तीन दिवस सुटी जाहीर केली आहे.
दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी सोमवार दि. 18 तर अधिकतर ठिकाणी मंगळवार दि. 19 रोजी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. कारवार तालुक्यात दि. 19 तारखेला गणेशोत्सव साजरा होत आहे. येथील आठवड्याच्या बाजारात सजावटीचे साहित्य फुले, फळे, माटोळीचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येथील मारुती गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळासह अन्य काही मंडळाच्या श्रींच्या मूर्तींचे यापूर्वीच आगमन झाले आहे. मारुती गल्लीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे.
नोकरी, उद्योग आणि व्यवसायाच्या निमित्ताने कारवार तालुक्यातील हजारो कुटुंबे गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील दूरवरच्या शहरात वास्तव्य करुन आहेत. यापैकी शेकडो कुटुंबे गणेशोत्सवाच्या निमित्ताने मूळ गावी परतली आहेत. त्यामुळे कारवार तालुक्यातील गावे गणेशप्रेमींच्या उपस्थितीने फुलून गेली आहे. तालुक्यासह जिल्ह्यातील मूर्तीकार श्रींच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवीत असून त्यांना दिवसाचे 24 तास अपुरे पडत आहेत. दरम्यान दक्षिण भारतातील काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोकर्ण आणि इडगुंजी येथे ही गणेशोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे.