सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक, पारदर्शक सेवा करावी
न्यायाधीश संदीप पाटील; जागृती सप्ताहाचे उद्घाटन
बेळगाव : सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिक व पारदर्शक सेवा करून समाजापुढे आदर्श निर्माण करावा, असे आवाहन वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश व जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव संदीप पाटील यांनी केले.कर्नाटक लोकायुक्त बेळगाव, जिल्हा कायदा सेवा प्राधिकरण बेळगाव, कृषी, बागायत, रेशीम खाते यांच्या संयुक्त विद्यमाने अधिकारी व कर्मचाऱ्य़ांसाठी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत जागृती सप्ताह-2025 चे आयोजन करण्यात आले आहे. एस. निजलिंगप्पा साखर संस्थेच्या सभागृहात बुधवारी (दि. 29) सप्ताहाचे उद्घाटन करून न्यायाधीश संदीप पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी लोकायुक्त बेळगाव विभागाचे पोलीस अधीक्षक हनुमंतराय व प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ कायदा सल्लागार राजेश जंबगी, एस. निजलिंगप्पा साखर संस्थेचे संचालक राजगोपाल उपस्थित होते.
कायदा सल्लागार राजेश जंबगी म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांनी पारदर्शकपणे सेवा बजावत जीवन सार्थकी लावावे. बोलणे व कर्तव्य यामध्ये प्रामाणिकपणा ठेवून कार्य करीत गेल्यास सेवा सार्थकी लागेल, असे राजगोपाल म्हणाले. त्यानंतर, अध्यक्षीय भाषणात हनुमंतराय यांनी जागृती सप्ताह आयोजनाचा उद्देश सांगितला. प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्याने भ्रष्टाचाराला थारा न देता सेवा बजावल्यास भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. कृषी खात्याचे सहसंचालक एच. डी. कोळेकर, रेशीम खात्याचे उपसंचालक महेशकुमार यांसह लोकायुक्त, कृषी, बागायत, रेशीम तसेच निजलिंगप्पा साखर संस्थेचे अधिकारी व कर्मचारी याप्रसंगी उपस्थित हेते.