सरकारी विभागांकडून कोट्यावधीची हेस्कॉमची थकबाकी
जिल्ह्यात 340 कोटींचे वीजबील थकले : ग्रामपंचायती सर्वात आघाडीवर
बेळगाव : सर्वसामान्य नागरिकांनी केवळ एक महिन्याचे वीजबील भरले नाही तर वीज कनेक्शन तोडून दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु सरकारच्याच विभागांनी कोट्यावधी रुपयांचे वीजबील थकविले आहे. बेळगाव जिल्ह्यातील विविध विभागांनी तब्बल 340 कोटी रुपयांचे वीजबील थकविले असल्याने आता हेस्कॉम कोणती कारवाई करणार पाहावे लागणार आहे. बेळगाव जिल्ह्यातील बेळगाव विभागात 22 हजार 70 सरकारी कार्यालयांमध्ये मीटर आहेत. त्यांचे 209 कोटी रुपयांचे वीजबील थकीत आहे. तर चिकोडी विभागात 9761 वीज मीटर असून तेथे 131 कोटी रुपयांचे वीजबील थकले आहे.
यामध्ये ग्रामपंचायतींसह पाटबंधारे विभाग, ग्रामीण पेयजल विभाग, आरोग्य विभाग, महानगरपालिका, नगरपालिका, वनविभाग यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील थकबाकी 340 कोटींच्या आसपास पोहोचल्याने हेस्कॉमच्या आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे बील भरण्यासाठी हुबळी येथील मुख्य कार्यालयाकडून हेस्कॉम अधिकाऱ्यांना वारंवार सूचना केल्या जात आहेत. संबंधित विभागांना अशा प्रकारच्या नोटिसाही पाठविण्यात आल्या आहेत. केवळ जिल्ह्यातील ग्रामपंचायतींकडून 158 कोटी तर पाटबंधारे खात्याकडून 154 कोटी रुपये येणे बाकी असल्याने ते भरण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू आहे.
निधीच्या कमतरतेमुळे थकबाकीत वाढ
राज्य तसेच केंद्र सरकारकडून स्थानिक स्वराज्य संस्था व ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून दिला जात असतो. या निधीतून विजेचे बील भरले जाते. परंतु निधीच उपलब्ध होत नसल्याने वीजबील थकले आहे. निधी मंजूर झाल्यास त्वरित वीजबील भरले जाईल, अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून हेस्कॉमला दिली जात आहेत.
100 टक्के वसुलीसाठी हेस्कॉम प्रयत्नशील
बेळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका,ग्रामपंचायती यांचे वीजबील मोठ्या प्रमाणात थकले आहे. काही विभाग टप्प्याटप्प्याने वीजबील भरत आहेत. परंतु 100 टक्के वसुलीसाठी हेस्कॉम प्रयत्नशील आहे.
-प्रवीणकुमार चिकाडे (मुख्य अभियंता हेस्कॉम)