मनपाच्या चंदिगड अभ्यासदौऱ्याला सरकारची मंजुरी
सत्ताधारी-विरोधी गटातील 58 नगरसेवक, सरकारनियुक्त 5 सदस्य, 2 अधिकारी रवाना होणार
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या चंदिगड अभ्यासदौऱ्याला सरकारने अखेर मंगळवार दि. 21 रोजी मंजुरी दिली आहे. मात्र दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नाही. चंदिगड स्मार्ट सिटी आणि चंदिगड शहराच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी लोकनियुक्त 58 नगरसेवक, पाच सरकारनियुक्त सदस्य आणि दोन अधिकारी व कर्मचारी या अभ्यासदौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. महानगरपालिकेच्या सभागृहात 29 ऑक्टोबर 2024 रोजी पार पडलेल्या बैठकीत चंदिगड दौऱ्याबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला होता. याबाबत महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी 7 जानेवारी 2025 रोजी चंदिगड दौऱ्याला परवानगी देण्यात यावी, यासाठी सरकारला पत्र पाठविले होते.
मनपा आयुक्तांच्या शिफारसीला अखेर सरकारने मंजुरी दिली असून मंगळवार दि. 21 रोजी दौऱ्याला मंजुरी मिळाल्याचे महापालिकेला कळविण्यात आले आहे. मात्र दौऱ्याची तारीख निश्चित झालेली नाही. चंदिगड अभ्यास दौऱ्यादरम्यान स्मार्ट सिटीची कामे आणि शहराचा विकास कशा पद्धतीने करण्यात आला आहे, याची पाहणी केली जाणार आहे. यापूर्वी महापालिकेचे नगरसेवक म्हैसूरला अभ्यासदौऱ्यासाठी गेले होते. त्यानंतर आता चंदिगडला अभ्यासदौऱ्यासाठी नगरसेवक व अधिकारी जाणार आहेत. दुसऱ्या टप्प्यातील महापौर, उपमहापौर निवडणुकीपूर्वी हा अभ्यासदौरा उरकला जाण्याची शक्यता आहे. अभ्यासदौऱ्यासाठी सत्ताधारी, विरोधी गटातील 58 नगरसेवक, सरकारनियुक्त पाच सदस्य व अधिकारी रवाना होणार आहेत.