For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा

05:04 PM Jun 16, 2025 IST | Radhika Patil
शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा
Advertisement

सातारा :

Advertisement

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे 26 जून रोजी सातारा जिह्यात आगमन होणार असून 30 जून रोजी पालखी सोहळ्याचा सोलापूर जिह्यात प्रवेश होणार आहे. माऊलीच्या पालखीचा मुक्काम लोणंद, तरडगाव, फलटण व बरड या ठिकाणी होणार आहे. या सोहळ्याच्या अनुषंगाने वारकऱ्यांना चांगल्या सोयी सुविधा मिळण्यासाठी शासकीय यंत्रणांनी आपापसात समन्वय ठेवून जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, पालखी मार्गावरील सुरू असलेली कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे पर्यटन, खनिकर्म व माजी सैनिक कल्याण मंत्री तथा सातारा जिह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

लोणंद येथील नगरपंचायत सभागृहात श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पूर्व तयारीच्या अनुषंगाने पालकमंत्री श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, फलटण उपविभागाचे प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, फलटण तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, खंडाळा तहसीलदार अजित पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फलटण उपविभागाचे उपअभियंता रविकुमार आंबेकर, लोणंद नगर पंचायतीचे नगराध्यक्ष मधुमती कालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्ची, लोणंद मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह विविध शासकीय विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

Advertisement

प्रारंभी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी नीरा नदीवरील दत्त घाट तसेच लोणंद येथील पालखी मुक्काम स्थळाची पाहणी करून तयारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

पालखी सोहळा चांगल्याप्रकारे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी उत्तम नियोजन करावे असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, पालखीतळ स्वच्छता, शौचालये, पाणी, आरोग्य, सुरक्षा, रस्ते, वीज, इंधन पुरवठा आदी महत्वपुर्ण बाबींमध्ये वारक्रयांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याबाबत दक्ष रहावे, अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिल्या.

लोणंद नगरपंचायतीला पालखी सोहळ्याच्या सुविधांच्या अनुषंगाने जिल्हा नियोजनमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल. पालखी मार्गावरील प्रशासनाने पालखी मार्गावर टँकरद्वारे पालखी तळावर वारकऱ्यांना स्वच्छ पाणीपुरवठा करावा. पालखी मार्गावर स्थिर वैद्यकीय पथके, औषध साठा, रुग्णवाहिका सुविधेसह सर्प व श्वान दंश इंजेक्शन उपलब्ध ठेवावीत. वारकऱ्यांना सर्दी, ताप, खोकला आदी आजार असणाऱ्या वारकऱ्यांची तपासणी, उपचार तातडीने होतील यासाठी आवश्यक तपासणीची व औषधे व्यवस्था आरोग्य पथकांकडे उपलब्ध ठेवावीत. महावितरणने संपूर्ण पालखी मार्गावर आपली अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक सतर्क आणि कार्यरत ठेवावे. विद्युत जनरेटरची व्यवस्था ठेवावी. जिल्हा परिषद व नगरपालिकांनी पालखी सोहळा पुढे गेल्यावर त्वरित त्या मार्गाची, गावांची स्वच्छता करावी. मुक्कामाच्या ठिकाणी वीज व्यवस्थेसाठी संबंधित जिल्हा परिषदेने जनरेटरची व्यवस्था करावी. पालखी मार्गावरील हद्दीतील सर्व शौचालय सुस्थितीत व स्वच्छ ठेवावीत. तात्पुरत्या शौचालयांची उपलब्धता ठेवावी.

पोलीस विभागाने पालखी आगमनावेळी होणाऱ्या गर्दीचे नियोजन करून नियंत्रण ठेवावे. यासाठी अतिरिक बंदोबस्त तैनात करावा.
मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील म्हणाले, पालखी प्रमुखांच्या संपर्कात राहून त्यांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, आरोग्य विभागाने खाजगी रुग्णालयातील 10 टक्के बेड राखीव ठेवण्याची व्यवस्था करावी. पालखी मुक्कामी असणाऱ्या तळावर सायंकाळी पुरेसा विद्युत पुरवठा करावा. प्रसंगी जनरेटर ही उपलब्ध ठेवावेत, आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास बाहेर पडण्यासाठी रस्त्यांच्या मार्गांची व्यवस्था करावी अशा सूचनाही त्यांनी केल्या.

अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद यांच्यासह आरोग्य, विद्युत, बांधकाम, रस्ते नगरपालिका अधिकाऱ्यांनी करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

  • वारकऱ्यांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा 2025 निमित्त वारकरयांच्या सेवेसाठी गावनिहाय सुविधा माहिती व लोकेशन मार्गदर्शनाचा क्यूआर कोड पंचायत समिती खंडाळा व फलटण यांनी उत्कृष्ट पद्धतीने संयुक्तकरित्या पहिल्यांदाच तयार केला आहे. याद्वारे वारकऱ्यांच्या सोयीसाठी काही गावांमध्ये अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक गावातील शौचालय, आरोग्य सेवा, पाणी, महिला स्नानगृहे, मुक्काम, निवास, पेट्रोल पंप व संपर्क माहिती मिळणार आहे. प्रत्येक सुविधेवर क्लिक करताच थेट त्याचे गुगल लोकेशन मॅपही पाहायला मिळणार आहे. हा क्यू आर कोड वारकऱ्यांच्या दर्शनासाठी भेट देणाऱ्या नागरिकांसाठी सर्व ठिकाणी प्रसिद्ध करावा, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी दिले.

Advertisement
Tags :

.