शहरात गौराईचे थाटात आगमन
मुकूट, नथ, बांगड्या, मंगळसूत्रासह सजली गौराई : घरोघरी भाजी-भाकरीचा नैवेद्य
बेळगाव : गणपती उत्साहाला जोडूनच गौरीचे आगमन झाले. भाद्रपद शुद्ध पक्षाच्या ज्येष्ठ नक्षत्राला गौरीचे पूजन होते, म्हणून त्यांना ज्येष्ठा गौरी म्हटले जाते. मंगळवारी महिलांनी पाणवठ्यावरून म्हणजेच विहिरीवरून गौर आणली. काही जणींनी खड्यांच्या, काही जणींनी रोपट्याच्या तर काही जणींनी मुखवट्याच्या गौरी उभ्या केल्या. गौरी आणताना पूर्णपणे मौन बाळगले जाते.
घरात गौर आणण्यापूर्वी तिच्या वाटेवर हळद आणि दूध घालून लक्ष्मीची पावले रेखाटण्यात आली. त्यानंतर गौर बसविण्यात आली. मुकूट, नथ, बांगड्या, मंगळसूत्र याशिवाय अनेक दागिने घालून गौर सजविण्यात आली. या निमित्ताने भाजी-भाकरीचा नैवेद्य दाखविण्यात आला. काही घरी शेपू आणि भोपळ्याच्या पानांची भाजी केली जाते. काही ठिकाणी मेथीची भाजी करण्यात आली.
पुराणानुसार सिंधूरपूर येथे नरान्तक नावाच्या राक्षसाने एकवीस हजार स्त्रियांना बंदी केले. याचा राग गणपतीला आला. गणपती, रिद्धी-सिद्धी व आणखी आठ मैत्रिणींनी स्त्रियांची सेना करून गणपतीला आपला सेनापती केले. त्यांनी नरान्तकाला ठार करून बंदिवान स्त्रियांची सुटका केली. या युद्धामध्ये सात स्त्रियांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्याबद्दल कृतज्ञता म्हणून सात खड्यांची गौर आणली जाते.