स्वत:च्या पायावर काढून घेतला कारचा टॅटू
कारबद्दल प्रचंड प्रेम, एकाच मॉडेलची 10 वाहने खरेदी
छंद मोठी गोष्ट असल्याचे आपण नेहमीच ऐकत असतो, परंतु माणूस छंदापोटी अशा काही गोष्टी करतो ज्यामुळे त्याची चर्चा होऊ लागते. अलिकडेच ब्रिटनच्या एका व्यक्तीने असेच कृत्य केले आहे. या व्यक्तीला एक कार अत्यंत पसंत आहे. याच मॉडेलची 10 कार्स त्याने खरेदी केली आहेत. परंतु त्याने आता स्वत:च्या पसंतीचा कारचा टॅटू देखील स्वत:च्या पायावर काढून घेतला आहे.
30 वर्षीय रॉबिन बार्टलेटला रिनॉल्ट कंपनीची एसपेस कार अत्यंत पसंत आहे, ही कार 1984 च्या काळापासून निर्माण केली जात आहे. त्याने आता याच मॉडेलची 10 कार्स खरेदी केल्या आहे. या कारच्या निर्मितीला 40 वर्षे पूर्ण झाल्यावर त्याने स्वत:च्या पायावर कारचा टॅटू काढून घेण्याचा निर्णय घेतला. माझा हा छंद आयुष्यावर वरचढ झाला आहे, याचमुळे टॅटू काढून घेण्याचा निर्णय घेतल्याचे तो सांगतो.
रॉबिनने इन्स्टाग्राम अकौंटवरही टॅटूची छायाचित्रे शेअर केली आहेत. जेव्हा मी 60 वर्षांचा होईन, तेव्हा या मूर्खपणाबद्दल खंत व्यक्त करेन किंवा कदाचित करणारही नाही. माझ्या काही मित्रांना हे कृत्य अत्यंत मजेशीर वाटले, तर काही जणांना मी वेडा असल्याचे वाटले. सध्या स्वत:च्या टॅटूविषयी आईवडिलांना देखील सांगितल नसल्याचे रॉबिनने म्हटले आहे.
लहानपणापासूनच ही कार मला पसंत होती. 2000 च्या दशकात एकदा शाळेच्या वतीने स्कीइंग ट्रीपवर गेलो होतो, त्यावेळी एक जुनी एमके1 एस्पेस कार पार्किंगमध्ये वेगाने आली, यात 7 मुलेमुली बसल्या होत्या आणि सर्वांनी एकाच रंगाच्या जॅकेटस परिधान केल्या होत्या. कारवर स्कीइंगची सामग्री ठेवण्यात आली होती. हे दृश्य माझ्या मनात कोरले गेले हेते असे रॉबिन सांगतात. सोशल मीडियावर रॉबिन यांची छायाचित्रे पाहून अनेक जण त्यांच्या या छंदाचे कौतुक देखील करत आहेत.