For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Gopichand Padalkar: आमच्या गाडीला बिरेक नाय, गोपिशेठ यांचं व्यक्तिमत्त्व आहे तरी काय?

01:10 PM Jul 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
gopichand padalkar  आमच्या गाडीला बिरेक नाय  गोपिशेठ यांचं व्यक्तिमत्त्व आहे तरी काय
Advertisement

या भागात नेत्यांनाही शेठ म्हणण्याची पध्दत आहे

Advertisement

By : शिवराज काटकर 

सांगली : आमदार गोपीचंद पडळकर... फेमस नाव गोपी शेठ! फेमस घोषणा - एकच छंद गोपीचंद! चाहत्यांनी स्वत:च या नावात ‘स्टाईल’ भरली आहे. धुमस चित्रपट आणि आमच्या गाडीला बिरेक नाय बरं का, या अल्बम साँगमुळे एक वेगळी ओळख पण आहे. या बिरेक गाण्याचे गीतकार सागर बेंद्रे, गायक साजन बेंद्रे यांनी पडळकरांचेच व्यक्तिमत्व गाण्यातून साकारलं आहे.

Advertisement

(उत्सुकता असणाऱ्यांनी युट्यूबवर पहावे किंवा ट्रोलर्सनी गेल्या तीन, चार दिवसात बनलेले मिम्स पहावेत) खानापूर, आटपाडी, सांगोला आणि परिसरातून देशभर पसरलेले सर्व जातीपातीचे सोने रिफाईन करणारे गलाई बांधव शेठ या नावाने ओळखले जातात. या भागात नेत्यांनाही शेठ म्हणण्याची पध्दत आहे.

आक्रमकता नसानसात भिनलेली, त्यात भल्याभल्यांच्या गर्दीतून वाट काढायची तर आपली एक स्टाईल हवीच. मग काय, शेठनी आक्रमक भाषण, अभ्यासाने प्रकट व्हायची कला उपयोगात आणली. भोळ्या भाबड्या धनगर, ओबीसी आणि साळी, माळी, तेली, तांबोळी मंडळींना हा आपलाच आवाज वाटू लागला.

तसे समाजातील बडे नेते या वाटचालीने अस्वस्थ झाले. त्यांनी या रोपट्याला सावलीत ठेवायचा प्रयत्न केला, तसे हा गडी उसळला. आटपाडी तालुक्याच्या झरे गावात पाहुण्याच्या एका लग्नात मध्यस्थी अंगलट आली. वादात वाद वाढला आणि विरोधकांच्या पथ्यावर पडला. किरकोळ मारामारीत पोलिसांनी मंगळसूत्र चोरीचा गुन्हा दाखल केला. (कारण त्यातून दंगल आणि दरोड्यासारखे गुन्हे दाखल करून अधिक काळ जेलमध्ये ठेवता येते.

विरोधक मोडीत काढायची ही राज्यभरातील राजकारण्यांची फेमस मोडस!) त्यातून हातात बेडी आली आणि ते छायाचित्र गेली अनेकवर्षे बदनामीसाठी उपयोगात आले. पडळकर यांचे त्यातले अनेक विरोधक आता देवाघरी गेले. निर्दोष सुटले पण त्या टीकेने त्यांची पाठ अगदी या पावसाळी अधिवेशनापर्यंत सोडली नाही. जितेंद्र आव्हाडांना पडळकरांभोवतीच्या गर्दीतून कोणी ...ये मुंब्य्राच्या.... ये .... च्या एक्स... असे डिवचले.

आदल्या दिवशी शेठनी सुप्रिया सुळेंवर जोराची टीका केलीच होती... आव्हाडांनी मग विधानसभेच्या लॉबीतून जाताना मंगळसूत्र चोर... असा शाब्दिक बाण सोडला आणि पुढचं सारं महाभारत घडलं...! मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातील सारेच आमदार माजलेत अशी लोकभावना झालीय असं म्हणावं लागलं.... गोपीशेठ आता मनातून उतरतील म्हणून बरीच मंडळी खुश झाली.... पण, इस्लामपूरचे ईश्वरपूर केले म्हणून सदाभाऊंसह गोपीशेठ पुन्हा मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ द्यायला हजर!

मंडळींनी पुन्हा कपाळावर हात मारून घेतला!! नाद करायचा नाय!!! कधीकाळी राज्यभरातील धनगर नेत्यांनी एकत्र येऊन या युवा नेत्याला दाबण्याचा प्रयत्न केला. तर आक्रमक भाषणाने शेठनी गर्दीतून शिट्या, टाळ्या वसूल केल्या. गावोगावच्या गर्दीत या शिट्ट्या, टाळ्या वाढू लागल्या आणि नेते अस्वस्थ झाले. ते नेते डिवचूही लागले.

आपलीच माणसं गाडीत घालून गर्दीत पेरायची आणि शिट्या, टाळ्या वाजवायचा हा उद्योग आहे! शेठ उत्तर देत न बसता एक दिवस बिरोबाच्या बनात आणि पंढरपुराच्या वाळवंटात हेलिकॉप्टरनेच उतरले! टीकाकारांच्या पांढऱ्या सदऱ्यांवर धूळ उडवत ते त्यांच्या खूप पुढे निघून गेले... आणि भल्या भल्या धनगर नेत्यांनी बिरोबाच्या बनात यायचे कायमचे सोडले... मग काय शेठना मोकळे रानच मिळाले! मध्यंतरी रजनीकांत स्टाईलने धुमस नावाचा एक सिनेमाही काढला.... त्यांच्या या प्रत्येक कृतीला प्रतिसाद देणारा एक वर्ग बनला आहे.

धनगर आरक्षण दिले नाही तर भाजपला मतदान करायचे नाही या भूमिकेने भाजपचे लक्ष वेधले आणि कालांतराने त्याच भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठवले. बारामतीकरांशी पंगा घ्यायला भलेभले तयार नसतात. पण शेठ सहज पवारांवर बोलून जातात आणि राज्यातील खूप मोठ्या वर्गाच्या टीकेचे धनीही बनतात... पक्षाने त्यांना अजित पवारांच्या विरोधात बारामतीतून उतरवले... अपेक्षेप्रमाणे हवा मोठी झाली... तिथे अनामत जप्त झाली. पण पवारांवर बोलायचे पडळकर थांबले नाहीत.

अजित पवार भाजपच्या सत्तेत उपमुख्यमंत्री तर गोपी शेठ मंत्रिमंडळाच्या बाहेर... अशी स्थिती झाली... पत्रकारांनी डोळ्यात पाणी येईपर्यंत प्रश्न विचारून भंडावून सोडले. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पुन्हा थोरल्या पवार आणि सुळे ताईंकडे या तोफेचे तोंड वळले... असं गोपीशेठ यांचं व्यक्तिमत्त्व म्हणजे एक अफलातून पॅकेज.

राजकारणात ‘कमिंग फ्रॉ म द ग्राउंड‘ असूनही स्टेजवर उभे राहिले की जाणवतं, हा माणूस ‘हाऊसफुल्ल सभागृहाचा हिरो‘ आहे. शब्द फेकले की टाळ्या ऐकायला मिळतातच मिळतात. त्यांचे बोलणे म्हणजे नुसती भाषणं नाहीत, तो एक ‘परफॉर्मन्स‘ असतो.

मिश्कील टोमणे, तिखट विधानं आणि त्यावर उठणाऱ्या चर्चांची राळ सगळं काही नियोजनबद्ध नसूनही अचूक. त्यामुळे या संन्याशाच्या काठीने भाजपने बऱ्याच जणांना धोपटून घेतले! मी दिल्ली नाही, पण दिल्लीला हलवीन! असा आत्मविश्वासया शैलीला ‘सावध भाषा‘ आवडत नाही. म्हणूनच कधी विरोधकांची झोप उडते, तर कधी आपल्याच पक्षात कुजबुज होते.

शेठ सांगतात, मी बोलतो ते उघड, तेच माझं खरं बळ! सांगायचं इतकंच गोपी शेठ हे राजकारणातले स्पॉटलाईटमध्ये राहणारे स्टेज आर्टिस्ट आहेत. त्यामुळे त्यांच्या नादाला लागणाऱ्यांना शेवटचा जाहीर इशारा कुणी वंदा, कुणी निंदा, जागेवर चिरफाड हा आमचा वादा! गोपी शेठचा नाद करायचा नाय!

Advertisement
Tags :

.