पहलगाममध्ये धर्म विचारून हिंदूवर गोळ्या का झाडल्या?, आता मुघलांचा इतिहास पुसण्याची वेळ
खानापूर येथील पुरातन महादेव मंदिरातील नंदीची अज्ञाताने तोडफोड केली होती
खानापूर : सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून पहिले हिंदूंनी बाहेर पडायला पाहिजे. सर्वधर्मसमभाव पाळण्याची जबाबदारी फक्त हिंदूंची आहे का? हिंदू मुस्लिम भाई-भाई असं म्हटलं जाते, मग जम्मू-काश्मीरमध्ये धर्म विचारून का फक्त हिंदू लोकांवर गोळ्या घातल्या गेल्या. हिंदुंवर अत्याचार होण्याची ही पहिलीच वेळ नसून मुघलांपासून अनेकांनी अत्याचार केले आहेत. आता मुघलांच्या खुणा असलेल्या गावांची नावे बदलण्याची वेळ आली असून तशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले.
खानापूर येथील पुरातन महादेव मंदिरातील नंदीची अज्ञाताने तोडफोड केली होती. शुक्रवारी ही घटना उघडकीस आल्यानंतर जतचे आमदार गोपीचंद पडळकर, हिंदू रणरागिणी हर्षा ठाकूर यांच्या हस्ते आयोजित महाआरती कार्यक्रमात आमदार गोपीचंद पडळकर बोलत होते. शिवप्रतिष्ठानचे राहुल टिंगरे, रोहित भगत, भाजप तालुकाध्यक्ष दाजी पवार, अक्षय भगत, संदीप ठोंबरे यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार पडळकर म्हणाले, हिंदूंना कायमच गोड बोलून अडकवण्यात येते. हिंदूंचा इतिहास मुघलांच्यापासून अन्याय सहन करणारा असाच आहे. पण आता हा अन्याय अत्याचार सहन केला जाणार नाही. खानापूरात महादेव मंदिरातील नंदीची तोडफोड करण्याचे धाडस विकृत मानसिकता पुसण्यासाठी मुघलांची ओळख पुसण्याचे काम आधी केले पाहिजे. ही ओळख पुसण्याच्या दृष्टिकोनातून सांगली जिल्ह्यातील काही गावाची नावे बदलण्याची आणि पूर्वीची नावे या गावांना देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे.
यामध्ये खानापूर शहराचे नाव भवानीपूर करावे, सुलतानगादे या गावाचे देखील नाव बदलावे, इस्लामपूर, जत तालुक्यातील उमदी गावाचे नावदेखील बदलावे. नंदी महाराजांच्या मूर्तीची तोडफोड करणे हे मुघली विकृत मानसिकतेचे षडयंत्र असल्याचे वाटते. या कृत्यामागे जो कुणी आहे त्याला पोलीस विभाग अटक करेल आणि शिक्षा देईल. पोलिसांनी तात्काळ तपास करून कारवाई करावी. अशी मागणी आमदार पडळकर यांनी केली. आमदार पडळकर पुढे म्हणाले, पूर्वीच्या लोकांनी षडयंत्र केले. हिंदी-चिनी भाई भाई, हिंदू-मुस्लिम भाई भाई. मग भाई भाई असताना काश्मीरमध्ये हा प्रकार का घडला ? धर्म विचारून गोळ्या का घातल्या.
हा काय प्रकार आहे ? सर्वधर्मसमभाव ही हिंदूंना दिलेली अफूची गोळी आहे. यातून पहिल्यांदा हिंदूंनी बाहेर पडावे. हे फक्त हिंदूंसाठीच लागू होत नाही. सर्वधर्मसमभाव फक्त हिंदूंनी बघायचा मग बाकीच्यांनी का बघायचा नाही? काश्मीरमधल्या पंडितांना कोणी घालवले? तिथे काय पाकिस्तानचे मुसलमान आले होते का ? त्यांच्या गल्लीत राहणाऱ्या लोकांनीच त्यांना घालवले. तिथे कोणी पाकिस्तानी माणूस आला नव्हता, अशी प्रतिक्रिया आ. पडळकर यांनी पहलगामच्या हल्ल्यावर दिली. यावेळी शिवभक्त व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.