तरुणावरील खुनी हल्लाप्रकरणी गुड्सशेड रोडच्या एकाला अटक
बेळगाव : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहताना झालेल्या वादावादीतून तरुणावर खुनी हल्ला केल्याच्या आरोपावरून न्यू गुड्सशेड रोड येथील एका तरुणाला माळमारुती पोलिसांनी अटक केली आहे. 21 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा एससी मोटर्सजवळ ही घटना घडली होती. भरमा मोहन जुवेकर (वय 26) राहणार न्यू गुड्सशेड रोड असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी मंगळवारी भरमाला अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. विकी ऊर्फ विवेक जुवेकरसह आणखी सात ते आठ जण अद्याप फरारी असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना पाहताना एससी मोटर्सजवळील सिटी बारमध्ये वादावादी झाली होती. वादावादीनंतर भरमाने आपला भाऊ व इतर सात-आठ जणांना बोलावून घेऊन रमेश महेश बालरड्डी (वय 23) मूळचा राहणार जिवापूर, ता. सौंदत्ती, सध्या राहणार उद्यमबाग याच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी पोलिसांनी भरमाला अटक केली आहे.