गुन्हेगाराकडून सव्वालाखाचा मुद्देमाल हस्तगत
सातारा :
शाहूनगर (सातारा) येथील घरफोडीच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून एक लाख 27 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डी.बी. पथकाला यश आले आहे. चैतन्य विशाल माने (वय 19, रा. रविवार पेठ, सातारा) असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शाहूनगर येथील गणेश हौसिंग सोसायटीमधील एका बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने, जुन्या काळातील पितळेची भांडी, चिल्लरचा डबा आदी वस्तूंची चोरी केली होती.
याप्रकरणी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व पोलीस पथकाने तांत्रिक गोष्टीRच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेतले होते. या संशयिताकडे गुन्ह्याबाबत तपास करत असताना त्याने ही घरफोडी केली असल्याचे सांगितले. तसेच या चोरीचा ऐवज त्याने लपवून ठेवला होता. तो पोलिसांनी हस्तगत केला आहे. न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक निरीक्षक शाम काळे, उपनिरीक्षक सुधीर मोरे, हवालदार किशोर जाधव, निलेश यादव, सुजीत भोसले, शंकर चव्हाण, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, कॉन्स्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले यांनी केली आहे.
डॉ. दाभोळकरांचे ऑफिस फोडल्याची कबुली
पोलिसांनी चोरट्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने डिसेंबर सन 2023 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या शाहूनगर येथील ‘तारांगण’ या ऑफिसमध्ये देखील चोरी केल्याची कबुली दिली. चोरट्याने रात्रीच्या वेळेस दरवाजा तोडून ऑफिसमध्ये प्रवेश करून लाकडी कपाटाचे दरवाजे तोडले होते. परंतु ऑफिसमध्ये मौल्यवान वस्तू मिळून आल्या नव्हत्या. याबाबत देखील सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. संशयित आरोपीवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.