गुड्सशेड रोड वाहतुकीसाठी बनला धोकादायक
ड्रेनेज खोदाईनंतर डांबरीकरणाकडे दुर्लक्ष, रहिवाशांतून संताप
बेळगाव : गुड्सशेड रोडवर ड्रेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली. परंतु, त्यानंतर रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नसल्याने सर्वत्र खड्डे पडले आहेत. यामुळे ये-जा करणेही अवघड झाले आहे. त्यातच पावसाळ्याच्या दिवसात खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहेत. परंतु, कोणत्याच विभागाकडून लक्ष पुरविले जात नसल्याने नागरिकांची नाराजी आहे. गोवावेस येथील मराठा मंदिर कॉर्नरपासून गुड्सशेड रोडपर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली आहे. वर्षभरापूर्वी या ठिकाणी वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आली होती. यानंतर तापुरत्या स्वरुपात खडी घालण्यात आली.
परंतु, रस्ता काही झाला नाही. वर्षभर धुळीमुळे आसपासचे विक्रेते, व्यापारी व नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. या परिसरातील गोकुळनगर, गोडसे कॉलनी तसेच रेल्वेस्टेशनला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे. रस्त्यामध्ये डांबर कमी आणि खडी अधिक असल्याचे दिसत आहे. विशेषत: महिला वाहनचालकांना वाहन चालविणेही अवघड झाले आहे. अनेक वेळा तक्रारी करून देखील महापालिका तसेच इतर सर्वच विभागांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सध्या पावसाला सुरुवात झाली असल्याने किमान तात्पुरत्या स्वरुपात तरी डागडुजीची मागणी करण्यात येत आहे.