बेळगावात 30 पासून वस्तू प्रदर्शन
वस्तू प्रदर्शन प्राधिकरणचे अध्यक्ष आयुब खान : सीपीएड ग्राऊंडवर आयोजन
बेळगाव : म्हैसूर दसरोत्सवादरम्यान भव्य वस्तू प्रदर्शन भरविण्यात आले होते. याला उदंड प्रतिसाद मिळाल्याने ते प्रदर्शन यशस्वी झाले. आता म्हैसूरच्या धर्तीवर बेळगाव शहरात प्रथमच वस्तू प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. हे प्रदर्शन 30 नोव्हेंबर ते 11 जानेवारीअखेर सीपीएड ग्राऊंडवर भरविण्यात येणार आहे. 30 रोजी सायंकाळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी, मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्य वस्तू प्रदर्शन प्राधिकरणचे अध्यक्ष आयुब खान यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. खान म्हणाले, वस्तू प्रदर्शन सुमारे 43 दिवस चालणार आहे. या प्रदर्शनात सरकारी स्टॉल, व्यावसायिक स्टॉल, खाद्यपदार्थांचे
स्टॉल, मुलांसाठी मनोरंजनात्मक पार्क, खेळणीचे स्टॉल असणार आहेत. तसेच दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले असून प्रदर्शन पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी पार्किंग सुविधा प्रदान करण्यात येणार आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून मैदानाभोवती विशेष विद्युत सुविधा, विविध प्रकारचे दिवे लावण्यात येणार आहेत. मुलांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मनोरंजनात्मक देखावे, परस्पर संवाद पार्क तसेच थ्रीडी तंत्रज्ञानाचा व्हर्चुअल पार्कही मुलांसाठी निर्माण करण्यात येणार आहे. मुलांना हसतखेळत शिक्षण घेता यावे, या उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी विजयकुमार होनकेरी, जि. पं. योजना संचालक रवी बंगारप्पनवर, प्राधिकरणचे सीईओ रुद्रेश के., रघुराज अर्स उपस्थित होते.