For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सुंदोपसुंदी अन् वस्त्रहरण!

06:30 AM Apr 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
सुंदोपसुंदी अन् वस्त्रहरण
Advertisement

माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी व उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात सध्या कलगीतुरा सुरू आहे. हे दोन्ही नेते वक्कलिग समाजाचे आहेत. या समाजावर पकड कोणाची? या मुद्द्यावर दोघांमध्ये चांगलीच जुंपली आहे. आजवर माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा हे वक्कलिगांचे नेतृत्व करीत होते. आता समाजाच्या नेतृत्वासाठी दोन नेत्यांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. या दोन्ही नेत्यांसाठी ही अस्तित्वाची लढाई आहे.

Advertisement

डी. के. शिवकुमार यांना बेंगळूर ग्रामीणमधून आपले बंधू डी. के. सुरेश यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणायचे आहे. तर कुमारस्वामी यांना आपले भावोजी डॉ. सी. एन. मंजुनाथ यांना याच मतदारसंघातून विजयी करायचे आहे. अस्तित्वाच्या लढाईत दोन्ही नेते एकमेकांवर तुटून पडू लागले आहेत. बेंगळूरजवळ देवेगौडा कुटुंबीयांची एक हजार एकर जमीन आहे, असा आरोप करीत या विषयावर हवेतर विधानसौधमध्ये चर्चा करण्याची आपली तयारी आहे, असे डी. के. शिवकुमार यांनी सांगितले. बिडदीजवळ आपली 48 एकर जमीन आहे. सिनेमा व्यवसायातून मिळालेल्या कमाईतून ही जमीन आपण खरेदी केली आहे. हवेतर त्यांनी स्वत: येऊन पहावे, असे आव्हान कुमारस्वामी यांनी दिले आहे.

या दोन्ही नेत्यांनी एकेरी भाषेत एकमेकांवर तोंडसुख घेणे सुरू केले आहे. आम्ही डी. के.शिवकुमार यांच्यासारखे बेकायदा खाण व्यवसायातून परदेशाला खनिज पाठवून आपण मोठे झालेलो नाही, अशा शब्दात कुमारस्वामी यांनी शिवकुमार यांच्यावर पलटवार केले आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप सर्वसामान्यांसाठी मात्र करमणुकीचे ठरू लागले आहेत. जणू एकमेकांच्या कर्तृत्वाबद्दल वेगवेगळ्या मार्गाने केलेल्या कमाईबद्दल हे दोघे निवडणुकीच्या काळात लोकांना माहिती करून देत आहेत, अशी परिस्थिती पहायला मिळते आहे. कोणत्याही गोष्टीचा दर ठरवणे, हे कुमारस्वामी यांना चांगलेच जमते. ब्लॅकमेल करण्यातही ते आघाडीवर आहेत, असे डी. के. शिवकुमार यांनी कुमारस्वामी यांच्याबद्दल उद्गार काढले आहेत. या संघर्षामुळे बेंगळूर ग्रामीणमध्ये चुरस वाढली आहे. या निवडणुकीत निजद-भाजपची युती असल्यामुळे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी कुमारस्वामी यांची पाठराखण केली आहे. डी. के. शिवकुमार हे कधीपासून वक्कलिग समाजाचे नेतृत्व करीत आहेत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. एकंदर समाजावर प्रभुत्व कोणाचे? यासाठी दक्षिणेत चांगलेच राजकारण रंगले आहे.

Advertisement

या निवडणुकीत भाजपमधील असंतोष वाढतोच आहे. कोप्पळचे खासदार संगण्णा करडी यांनी भाजपला राम राम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. पक्षाने या निवडणुकीत त्यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे आपल्याच पक्षाविरुद्ध त्यांची खदखद वाढली होती. गुलबर्गा जिल्ह्यातील आणखी एक नेते मालिकय्या गुत्तेदार यांनीही भाजपमधून बाहेर पडण्याचा विचार सुरू केला आहे. पक्षानेच आमच्या घरात फूट पाडली. आपला भाऊ नितीनला भाजपमध्ये घेताना आपल्याला विश्वासात घेतले नाही. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांचे चिरंजीव बी. वाय. विजयेंद्र, सी. टी. रवी आदी नेत्यांमुळे पक्षाला धक्का पोहोचतो आहे. येडियुराप्पा यांना आपण वडिलांच्या जागी मानत होतो. त्यांनीच आपल्याला दगा दिला आहे, असा गंभीर आरोप मालिकय्या यांनी केला आहे. 19 एप्रिल रोजी ते आपला निर्णय जाहीर करणार आहेत. आपला भाऊ जर भाजपमध्ये आला तर आपण पक्षात राहणार नाही, असे नेत्यांना सांगितले होते. आपल्याला विश्वासात न घेताच नितीनला पक्षात घेतले आहे. याचाच अर्थ पक्षाला आपली गरज राहिली नाही, असा होतो. त्यामुळेच भाजपमधून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचे मालिकय्या यांनी सांगितले आहे.

संगण्णा करडी, मालिकय्या गुत्तेदार यांच्यापाठोपाठ के. एस. ईश्वरप्पा हे पक्षासाठी मोठी डोकेदुखी ठरले आहेत. त्यांनी लोकसभेसाठी शिमोग्यामधून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांची समजूत काढण्यात कोणत्याच नेत्याला यश आले नाही. पिता-पुत्रांची मक्तेदारी संपुष्टात आणण्यासाठी आपण लढणारच, या भूमिकेवर ईश्वराप्पा ठाम आहेत. बसनगौडा पाटील-यत्नाळ यांच्यासारखे स्टार प्रचारक ईश्वराप्पा यांच्या मागे आहेत. ईश्वराप्पा आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. चूक त्यांची नाही, पक्ष एकाच कुटुंबीयांच्या ताब्यात किंवा तावडीत सापडला आहे.

घराणेशाहीच्या राजकारणापासून पक्षाला वाचवायचे आहे, असे सांगत पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करतानाच बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी येडियुराप्पा, विजयेंद्र व राघवेंद्र यांच्यावर टीका सुरूच ठेवली आहे. त्यामुळे भाजपमध्ये नेमके काय चालले आहे? याविषयी कार्यकर्ते संभ्रमात आहेत. पक्षाच्या अनेक जुन्याजाणत्यांना या निवडणुकीत उमेदवारी मिळाली नाही, याची सल अनेकांना आहे. त्यामुळेच प्रमुख नेतेच आपल्याच पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध उघडपणे टीका करू लागले आहेत. सध्याचे चित्र पाहता भाजपचे विरोधक विरोधी पक्षात नाहीत तर त्यांच्याच पक्षात वावरत आहेत. ही परिस्थिती हाताळणे राज्य नेतृत्वासमोरही आव्हानात्मक ठरते आहे.

प्रचाराच्या भरात महिलांवर बेताल व बेछूट टीका केली जात आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शामनूर शिवशंकरप्पा यांच्यापासून त्याची सुरुवात झाली. महिला या स्वयंपाक घरापुरत्याच मर्यादित आहेत, असे त्यांनी सांगितले होते. त्यांच्या या वक्तव्याचा देशभरात विरोध झाला. त्यानंतरच एच. डी. कुमारस्वामी हे महिलांवरील टीकेमुळे वादग्रस्त ठरले आहेत. काँग्रेस सरकारने महिलांसाठी सुरू केलेल्या मोफत बसप्रवासाच्या योजनेमुळे खेड्यातील आया-बहिणींची वाट चुकली आहे, अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत कुमारस्वामी वादग्रस्त ठरले आहेत.

यासंबंधीचा वाद वाढताच आपल्या वक्तव्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला आहे. नंतरचा क्रमांक लागतो तो माजी आमदार, भाजप नेते संजय पाटील यांचा. महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर टीका करण्याच्या भरात ‘आक्काला आज झोपेची घ्यावी लागेल. नाहीतर एक्स्ट्रा पेग मारावा लागेल’ असे म्हटले होते. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर धरणे धरले. आपण लक्ष्मी हेब्बाळकरांचा नामोल्लेखच केला नाही तर या विषयावर वाद कशाला? असे सांगतानाच पेग म्हणजे दारू का समजता? एनर्जी ड्रिंक्सही असू शकते, अशी सारवासारव त्यांनी केली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान महिला उमेदवार व नेत्यांवर टीका करताना सार्वजनिक सभ्यतेची मर्यादा ओलांडली जात आहे. स्त्राr समानतेचे गोडवे गाणाऱ्या राजकीय नेत्यांनी ती खरोखरच अंमलात आणण्याचे औदार्य दाखविण्याची गरज आहे.

Advertisement
Tags :

.