अलविदा नदाल!
22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन शेवटच्या सामन्यात हरला : लाल मातीवरील बादशहाचा टेनिसला गुडबाय
वृत्तसंस्था/ मलागा, स्पेन
लाल मातीचा बादशहा राफेल नदालची टेनिस कारकीर्द संपुष्टात आली आहे. डेव्हिस कपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्पेनचा नेदरलँड्सकडून पराभव झाला. 22 वेळचा ग्रँडस्लॅम चॅम्पियन राफेल नदालने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला, ज्यात त्याला पराभव पत्करावा लागला. मंगळवारी मलागा येथील त्याच्या घरच्या मैदानावर त्याने शेवटचा डेव्हिस कप सामना खेळला, तथापि तो हरला. नेदरलँड्सच्या 80 व्या मानांकित बोटिक व्हॅन डी झिडशल्पने 6-4, 6-4 ने नदालला पराभूत केले. सलग 29 सामने जिंकून नदालला डेव्हिस कपमध्ये पराभव पत्करावा लागला आहे.
डेव्हिस कपमधील शेवटचा सामना खेळण्यापूर्वी नदाल भावूक झाला होता. राष्ट्रगीत सुरु असताना त्याच्या डोळ्यातून अश्रूही वाहत होते. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला आहे. शेवटचा सामना जिंकून नदाल चाहत्यांना आनंद देऊ शकला नाही. पराभवानंतर त्याच्या चाहत्यांची दुहेरी निराशा झाल्याचे पहायला मिळाले. शेवटच्या सामन्यात त्याचे कुटुंबीयही त्याला साथ देण्यासाठी आले होते. टेनिला अलविदा करत नदालने आपला 20 वर्षाचा प्रवास थांबवला आहे. घरच्या मैदानावर त्याला पाहण्यासाठी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
अखेरचा सामना अन् भावनिक निरोप
नदालने गेल्या महिन्यात ऑक्टोबरमध्ये निवृत्तीची घोषणा केली होती. डेव्हिस कपमधील हा शेवटचा सामना असेल असे त्याने सांगितले होते. तथापि, मंगळवारी डेव्हिस चषक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत स्पेनसमोर नेदरलँडचे आव्हान होते. यावेळी पुरुष एकेरीत नदालचा सामना बोटिक व्हॅन डी झिडशल्पशी झाला. बोटिकने या सामन्यात सुरुवातीपासूनच नदालला कडवी टक्कर दिली. त्याने पहिल्या सेटमध्ये नदालचा 6-4 अशा फरकाने पराभव केला. दुसऱ्या सेटमध्येही बोटिकने 5-4 अशी आघाडी घेतली होती, पण नदालने पुनरागमन करत 4-3 अशी आघाडी घेतली. मात्र त्याला हा सेटही जिंकता आला नाही. बोटिकने दुसरा सेटही 6-4 असा जिंकत सामना जिंकला.
जगाने माझी एक चांगली व्यक्ती म्हणून आठवण ठेवावी आणि माझ्या मागे येणाऱ्या मुलांनी त्यांच्यापेक्षा मोठी स्वप्ने पाहावीत. टेनिस सोडताना मी मन:शांती घेऊन जात आहे की मी एक वारसा सोडला आहे, जो मला वाटतो की केवळ एक क्रीडा नाही तर वैयक्तिक वारसा आहे. टायटल्स हे फक्त नंबर आहेत. पण एक चांगला माणूस म्हणून मला अधिक लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. एक मुलगा ज्याने त्याच्या स्वप्नांचे अनुसरण केले आणि मी जे स्वप्न पाहिले होते त्यापेक्षा जास्त साध्य केले, असे भावनिक बोल त्याने सरतेशेवटी केले.
गोल्डन स्लॅम
नदालने आपल्या कारकिर्दीत 22 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. यामध्ये 14 फ्रेंच ओपन, 2 ऑस्ट्रेलियन ओपन, 2 विम्बल्डन आणि 4 यूएस ओपन विजेतेपदांचा समावेश आहे. याशिवाय, ऑलिम्पिकमध्ये दोन वेळा सुवर्णपदकही जिंकले आहे. जगातील फक्त तीन खेळाडू आहेत ज्यांनी गोल्डन स्लॅम जिंकले आहेत. यामध्ये नदालचा समावेश होतो. गोल्डन स्लॅम म्हणजे जेव्हा एखादा खेळाडू एका कॅलेंडर वर्षात चार ग्रँडस्लॅम जिंकतो आणि त्याच वर्षी ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो. टेनिस विश्वास रॉजर फेडरर, नोव्हॅक जोकोविच व राफेल नदाल यांनाच अशी कामगिरी करता आली आहे.
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा दुसरा टेनिसपटू
पुरुष एकेरीत सर्वाधिक ग्रँडस्लॅम जिंकणारा नदाल हा दुसरा खेळाडू आहे. नदालने 22 विजेतेपद पटकावले आहेत. सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम जिंकले आहेत. अवघ्या 4 वर्षांपूर्वी स्वित्झर्लंडचा महान टेनिसपटू रॉजर फेडरर निवृत्त झाला. आता नदालनेही खेळाला अलविदा केला आहे. फेडररने 20 ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावली होती. विशेष म्हणजे, फ्रेंच ओपनचे जेतेपद सर्वाधिक 14 वेळा जिंकणारा नदाल हा पुरुष खेळाडू आहे. म्हणूनच नदालला क्ले कोर्टाचा राजा म्हटले जाते. फ्रेंच ओपनमध्ये 19 वेळा भाग घेत असताना नदालने 112 सामने जिंकले आहेत आणि त्याला फक्त 4 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे, जो कोणत्याही एका ग्रँड स्लॅममधील पुरुष आणि महिला गटातील जागतिक विक्रम आहे.