For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

चांगला योग म्हणजे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणं

06:37 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
चांगला योग म्हणजे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणं
Advertisement

महिष्मती नगरीचा राजा असलेल्या वरेण्याला मानवी सुखदु:खांपासून मुक्त होण्याचा श्रेष्ठ मार्ग प्रत्यक्ष अनुभवायचा होता म्हणून त्याने बाप्पांना विनंती केली की, हे सामर्थ्यसंपन्ना, महाबाहु सर्व विद्या उत्तम प्रकारे जाणणाऱ्या, सर्व शास्त्रांच्या अर्थाचे तत्त्व जाणणाऱ्या विघ्नेश्वरा मला तूच योग सांग. असा अधिकार मिळण्यासाठी आहे त्यात समाधानी असणं ही पहिली अट आहे आणि ईश्वराच्या भक्तीत रंगून जाणे ही दुसरी अट आहे. वरेण्य राजा दोन्ही अटी पूर्ण करत असल्याने बाप्पा तेजस्वी ज्ञानदीपाने वरेण्यराजाचे अज्ञान दूर करणार आहेत.

Advertisement

श्री गजानन म्हणाले, परमार्थात चित्तशुद्धी होणं फार महत्त्वाचं आहे आणि तुझी बुद्धी शुद्ध होऊन सन्मार्गाला लागली असल्याने मी तुला गीता सांगणार आहे. प्रपंचात तू विरक्त झालेला आहेस म्हणजे आहे त्यात समाधानी आहेस आणि माझं स्वरूप जाणून घेण्यास तू उत्सुक आहेस म्हणून योगरूपी अमृत असलेली व समग्र शास्त्रांचा उगम असलेली गणेशगीता मी तुला सांगतो. वरेण्य राजाला मुख्यत: पारमार्थिक दृष्ट्या योग म्हणजे काय ते बाप्पांच्याकडून समजून घ्यायचं होतं. योग हा शब्द ‘युज’ या संस्कृत धातूपासून बनलेला आहे. योग म्हणजे जोडले जाणे युक्त असणे. हा अर्थ लक्षात घेतला की, परमार्थातला उत्तम योग म्हणजे आत्म्याचे परमात्म्यात विलीन होणे ही संगती लगेच लागते. राजाला बाप्पांच्याकडून आत्म्याचे परमात्म्यात विलीन होण्यासाठी चांगली संधी कशी उपलब्ध होईल हे जाणून घ्यायचंय. हे त्यानं बाप्पांना पाचव्या श्लोकात केलेल्या विनंतीवरून आपल्या लक्षात आलंय.

बाप्पा टप्प्याटप्प्याने हा मुद्दा स्पष्ट करणार आहेत. सर्वप्रथम परमार्थाच्या दृष्टीने योग कशाला म्हणता येईल ते बाप्पा सांगत आहेत. त्याआधी सामान्य माणसाच्या दृष्टीने व्यावहारिक दृष्ट्या योग म्हणजे काय ते बघू. माणसाचं जीवन अनेक योगायोगानी भरलेलं असतं. त्याला अनुकूल गोष्ट घडली की, चांगला योग असं त्याला वाटतं. त्यामुळे माणूस नेहमीच्या बोलण्यात योग हा शब्द अगदी सहजी वापरतो. एखादा मनुष्य भेटावा असं फार वाटत असतं मग तो अचानक समोर आला की, बरं झालं भेटलास, योग चांगला नाहीतर मला हेलपाटा पडला असता असं म्हणतो. सर्वसामान्य मनुष्य चांगला योग म्हणजे चालून आलेली किंवा दैववशात मिळालेली चांगली संधी असं समजतो. ही झाली व्यवहारातली गोष्ट. राजाला बाप्पा सांगतायत की, ज्याला आध्यात्मिक प्रगती साधायची आहे त्याच्या दृष्टीने चांगला योग काही वेगळाच असतो. म्हणून बाप्पा आधी सामान्य माणूस ज्याला व्यावहारिक दृष्ट्या चांगला योग समजतो त्या सगळ्याची एक लांबलचक यादी देतात आणि सांगतात की, आध्यात्मिक प्रगती साधायसाठी आवश्यक तो योग वेगळा असून दैनंदिन व्यवहारात माणसे ज्याला चांगला योग म्हणतात त्या योगाला अध्यात्मात निश्चितच चांगला योग म्हणता येणार नाही. बाप्पा पुढील श्लोकातून माणसे ज्या गोष्टी मिळणे म्हणजे चांगला योग समजतात त्या सर्व गोष्टींचा उल्लेख करत आहेत.

Advertisement

योगं योगमित्याहुर्योगो योगो न च श्रिय: ।

न योगो विषयैर्योगो न च मात्रादिभिस्तदा ।। 7 ।।

कोणत्याही वस्तूशी योग होणे याला योग म्हणत नाहीत, संपत्तीशी योग होणे याला योग म्हणत नाहीत, विषयांशी योग होणे याला योग म्हणत नाहीत, इंद्रियांशी योग होणे याला योग म्हणत नाहीत.

योगो य: पितृमात्रादेर्न स योगो नराधिप ।

यो योगो बन्धुपुत्रादेर्यश्चाष्टभूतिभि: सह ।। 8 ।।

हे राजा, माता, पिता इत्यादिकांशी योग होणे हा योग नव्हे, बंधु, पुत्र इत्यादिकांशी योग होणे हा योग नव्हे. अष्टसिद्धींशी योग होणे हा योग नव्हे.

क्रमश:

Advertisement
Tags :

.