महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोकणच्या औद्योगिकीकरणासाठी शुभवार्ता

06:44 AM Nov 29, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तब्बल चौदा वर्षांपासून राज्याचे उद्योगमंत्रीपद कोकणच्या वाट्याला आलेले आहे. यातून औद्योगिकीकरणाला दिशा मिळण्याऐवजी दशा झालेली असतानाच आता दीर्घकाळानंतर कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील अतिरीक्त लोटे औद्योगिक वसाहतीत जगत्विख्यात कोकाकोला प्रकल्पाची मुहूर्तमेढ गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते रोवली जाणार आहे. जैतापूर अणूऊर्जा, नाणार रिफायनरीने औद्योगिक वातावरण काहीसे गढूळ झालेले असतानाच कोकाकोला ही औद्योगिक विकासाच्या नव्या पर्वाची नांदी ठरावी.

Advertisement

खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहत विस्तारीत क्षेत्रातील असगणीच्या माळरानावर कोकाकोला प्रकल्पाचे अखेर आगमन झाले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या न्युयॉर्क दौऱ्यात कोकणच्या औद्योगिक विकासाच्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल पडताना शीतपेय बनवणाऱ्या कोकाकोला कंपनीबरोबरच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. सुमारे पंधराशे कोटी रूपये गुंतवणुकीतून उभ्या राहणाऱ्या या प्रकल्पातून मोठा रोजगार उपलब्ध होणार आहे. प्रकल्पाच्यादृष्टीने महत्त्वाचे असलेल्या कोयनेचे प्रचंड अवजल, जवळचा कोकण रेल्वे मार्ग, तसेच गरज पडलीच तर गुहागर अथवा दापोली हे जवळचे बंदर या गोष्टी प्रकल्पासाठी महत्त्वपूर्ण असल्याने प्रकल्पाची येथे उभारणी करताना याचा विचार झाला.

Advertisement

प्रकल्पाच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्यानंतर कंपनी अधिकाऱ्यांनी अनेकवेळा येथे येऊन भेटी दिल्या. हवा, पाणी, मातीचे नमुने तपासले. त्यानंतर मात्र अचानकपणे या प्रकल्पाने लोटेतून बारामतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार तेथे एमआयडीसीने त्याना 90 एकर जागा दिली. त्या जागेची शुल्कही आकारणी झाली. मात्र प्रकल्प उभारणीला सुरूवात मात्र केली नव्हती. मात्र असे असतानाच कोरोनानंतर राज्य सरकारमध्ये औद्योगिकदृष्ट्या वातावरण काहीसे सकारात्मक झाल्यानंतर एमआयडीसीनेही कोकाकोलाला प्रकल्प उभारणीसाठीचे पर्याय दिले आणि त्यातूनच कोकाकोलाने पुन्हा लोटेकडेच आपला मोर्चा वळवला. गुरूवारी उद्योगमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि उद्योगमंत्री सामंत यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे.

दरम्यान, या प्रकल्पाला लागूनच रेल्वेचा रोलिंग स्टॉक कंपोनंट प्रकल्प सध्या आकार घेत आहे. कोकण रेल्वेचा कायापालट करणाऱ्या तत्कालीन रेल्वेमंत्री, कोकणचे सुपूत्र सुरेश प्रभू यांच्या दूरदृष्टीतून हा प्रकल्प साकारत आहे. भविष्यात कोकणच्या प्रगतीत महत्त्वाचे योगदान देणारा हा प्रकल्प कोकणातील एकमेव आणि मोठा सरकारी प्रकल्प आहे. प्रभू यांच्यामुळे काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या कोकण रेल्वेलाही आर्थिक सुबत्ता आणली. कोकणात लोटे विस्तारीत टप्प्यात उभा रहात असलेला आधा†नक रेल्वे कोच (डबे) व रेल्वे व्हील बनवण्याचा कारखाना हा त्यांच्याच प्रयत्नाचा एक भाग आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ तथा एमआयडीसीने खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीच्या 650 हेक्टर विस्तारीत क्षेत्र नव्या प्रकल्पासाठी विकसीत करण्याच्यादृष्टीने पावले टाकल्यानंतर सप्टेंबर 2016मध्ये तत्कालीन केंद्रीय रेल्वेमंत्री प्रभू यांच्याहस्ते या रेल्वेच्या रोलिंग स्टॉक कंपोनंट कारखान्याचे भूमिपूजन झाले. सुमारे 50 एकर क्षेत्रावर 450 कोटी रूपये खर्चून उभारण्यात येत असलेला हा प्रकल्प कोकणातील सर्वात मोठा आणि पहिलाच सरकारी प्रकल्प आहे. आजपर्यंत कोकणात रासायनिक कारखान्यांनी वातावरण काळवंडलेले असताना हा प्रकल्प मात्र त्याला अपवाद ठरणारा आहे. याचबरोबर या प्रकल्पामुळे मोठ्याप्रमाणात रोजगारही उपलब्ध होणार आहे. परिसराचा कायापालट करणाऱ्या या प्रकल्पात वेल्डर, मोल्डींग टेक्ना†शयन, वायरमन, रंगारी, प्लंबर, फोम मेकर, ा†फटर यांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पाचे कामही आता अंतिम टप्प्यात आलेले आहे.

मुळातच कोकणात केवळ लोटे विस्तारीत क्षेत्रातच विरोध नाही, यापूर्वी जैतापूर अणूउर्जा प्रकल्पापासून ते नाणार रिफायनरी, मार्गताम्हाने, निवळी, वाटद अशा असंख्य औद्योगिक वसाहती, प्रकल्पांना विरोध झाला म्हणून त्या रखडल्या आहेत. तसे पाहिले तर कोकणात उभे राहिलेले प्रकल्प हेही सहजासहजी झालेले नाहीत. प्रकल्प आला की विरोध ठरलेलाच. यातूनच कोकणातील औद्योगिकीकरणाबाबत वेगळाच मेसेज उद्योग जगतात गेला आहे. अगदी एन्रॉनपासून उभ्या राहिलेल्या साऱ्या उद्योगांची जंत्री उघडली की विरोधाची परिचिती येते. मात्र यातून कोकणी जनतेच्या पदरात काय तर तेलरूपी उद्योग गेले, रोजगार रूपी तेल गेले आणि हाती केवळ धुपाटणेच आले आहे.

उद्योगमंत्रीपदाचा कोकणला उपयोग काय?

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नारायण राणे यांच्याकडे उद्योगमंत्रीपद होते. त्यानंतर शिवसेना-भाजपा युती आणि त्यानंतर पुन्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये सुभाष देसाई यांच्याकडेच उद्योगखात्याची धुरा पुन्हा आली आहे. वर्षभरापूर्वी राज्यातील सत्तांतरानंतर महायुतीमध्ये उद्योगमंत्री पद रत्नागिरीच्या उदय सामंत यांच्याकडे आले. म्हणजेच गेल्या चौदा वर्षांपासून उद्योगखात्याचे कॅबिनेट मंत्रीपद कोकणात असतानाही कोकणच्या औद्योगिकीकरणाला दिशा मिळण्याऐवजी दशाच अधिक झालेली दिसून येते. कोकण सुपूत्रांच्या उद्योगमंत्रीपदाच्या कार्यकालात किती उद्योग नव्याने आले, हे शोधण्यासाठी भिंग घेऊनही काहीच सापडणार नाही. तथापि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर कोकाकोलासारखे प्रकल्प मार्गी लागत आहेत.

औद्योगिक वसाहती ओस

कोकणातील औद्योगिक वसाहती ओस पडल्या आहेत. तेथे बंद कारखान्यांची केवळ थडगीच शिल्लक राहिलेली आहेत. दीर्घकाळ उद्योगमंत्रीपद असतानाही नवे उद्योग नाहीत. येणाऱ्या उद्योगांनाही प्रखर विरोध. मग औद्योगिकीकरणाला दिशा मिळणार तरी कशी. फलोत्पादन ा†जल्हा असतानाही प्रा†क्रया उद्योग आलेले नाहीत. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नोकरी, धंदे नसल्याने इथला तरूण उदरनिर्वाहासाठी बाहेर पडल्याने कोकणात बहुतांशी घरांना कुलुपे लागली आहेत. त्याचा काहीसा परिणाम आता मतदारांवरही होऊ लागला आहे. मतदानाच्यावेळी मतदारांना गावात आणण्यासाठी मोठमोठया शहरात मेळावे घेणाऱ्यांनी या गोष्टीचा विचार जरुर करावा.

औद्योगिकीकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न हवेत

कोकाकोला प्रकल्प भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह उद्योगमंत्री, वरीष्ठ अधिकारी कोकणात येत आहेत. आजही कोकणातील उद्योजकांच्या समस्या कायम आहेत. अणूऊर्जा प्रकल्प आणि नाणार रिफायनरीमुळे कोकणातील औद्योगिक वातावरण दूषित झाले आहे. ते वातावरण दूर करण्याचा प्रयत्न कोकाकोलाच्या माध्यमातून होणार आहे. या प्रकल्पाबरोबरच येणाऱ्या काळात नवे उद्योग आले तर येथील तरूणांच्या हाताला काम मिळेल. कोकणची अर्थव्यवस्थाही मजबूत होईल.

राजेंद्र शिंदे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article