For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घर बांधकाम करणाऱ्यांना खुशखबर

12:13 PM Nov 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
घर बांधकाम करणाऱ्यांना खुशखबर
Advertisement

वीजमीटरसाठीच्या ओसी-सीसी नियमात शिथिलता, सहा महिन्यांनी मिळणार वीजमीटर, बिल्डिंग परमिशनची मात्र सक्ती

Advertisement

बेळगाव : मागील सहा महिन्यांपासून वीजमीटरसाठी ओसी व सीसी प्रमाणपत्रांची सक्ती करण्यात आल्याने वीजमीटर बसविणे थांबले होते. यामुळे बेळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक घरांना वीजमीटरविना थांबावे लागले. अखेर राज्य सरकारने याबाबतचा नवा निर्णय लागू केला असून 1200 चौरस फुटापेक्षा कमी आकाराच्या घरगुती बांधकामांना यापुढे वीजमीटर दिले जाणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी हेस्कॉमकडून नोव्हेंबरपासून केली जाणार आहे.

अनधिकृत वसाहती वाढत असल्याने त्यांना रस्ते, गटारी, वीज, पाणी यांची व्यवस्था करणे केंद्र व राज्य सरकारला डोकेदुखीचे ठरत होते. या अनधिकृत वसाहतींना चाप लावण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्या दरम्यान ओसी (ऑक्युपन्सी सर्टिफिकेट) तसेच सीसी (कम्प्लिशन सर्टिफिकेट) घेणे सक्तीचे असल्याचे आदेश दिले होते. या आदेशाची अंमलबजावणी कर्नाटकात एप्रिल 2025 पासून केली जात आहे. बेळगाव परिसरात अनधिकृत वसाहती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे वीजमीटर देणे पूर्णपणे थांबवण्यात आले होते.

Advertisement

मागील सहा महिन्यात वीजमीटर न मिळाल्याने नवीन बांधकामांना फटका बसला. त्यामुळे मीटर केव्हा मिळणार, या प्रतीक्षेत नागरिक होते. ग्रेटर बेंगळूर येथे दोन महिन्यांपूर्वी अधिकृत वसाहतींना ओसी व सीसी प्रमाणपत्राची सक्ती शिथिल करण्यात आली होती. आता याच धर्तीवर संपूर्ण राज्यात या दोन्ही प्रमाणपत्रांची सक्ती शिथिल करण्यात आली आहे.

बिल्डिंग परमिशन सक्तीचेच

राज्य सरकारने ओसी व सीसी प्रमाणपत्राची सक्ती शिथिल केली असली तरी प्रत्येक घरगुती ग्राहकाला बिल्डिंग परमिशन तसेच अॅप्रुव्हल प्लान द्यावा लागणार आहे. 1200 स्क्वे. फूटपेक्षा कमी बांधकाम असलेल्या ग्राऊंड + टू फ्लोअर, बेसमेंट + थ्री फ्लोअर या घरांनाच ओसी व सीसीची आवश्यकता राहणार नाही. याहून अधिक बांधकामांना ओसी व सीसी देणे बंधनकारक असल्याचे हेस्कॉमने 30 ऑक्टोबर रोजी बजावलेल्या आदेशामध्ये म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.