बिहारमध्ये कर्मचाऱ्यांसाठी शुभवार्ता
वृत्तसंस्था / पाटणा
बिहार सरकारने राज्य सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक यांना दिलाळी पूर्वीच मोठे आनंदाचे वृत्त दिले आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महगाई भत्त्यात वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हा निर्णय शुक्रवारी घोषित केला असून त्यामुळे सध्याच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ होणार आहे. सध्या बिहारमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 55 टक्के इतका महागाई भत्ता दिला जातो. मात्र आता तो 58 टक्के केला जाणार आहे. विविध राज्यसरकारी कर्मचारी संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
बिहारच्या मंत्रिमंडळाने शुक्रवारी राज्य सरकारच्या 129 कल्याणकारी योजनांना संमती दिली. या योजनांमध्ये प्रामुख्याने राज्य सरकारचे विकास प्रकल्प आहेत. अधिकाऱ्यांच्या विविध विभागांवर नियुक्त्या आणि आणि अनेक कल्याणकारी योजनांनाही संमती दिली गेली. त्यामुळे या योजनांना त्वरित निधी उपलब्ध होणार असून त्या मार्गी लागणार आहेत. बिहारमध्ये येत्या नोव्हेंबरमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. तिची घोषणा होण्याआधी हे निर्णय घेण्यात आले आहेत.