For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बळीराजासाठी शुभवार्ता : नववर्षात पर्जन्यमान समाधानकारक

11:09 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
बळीराजासाठी शुभवार्ता   नववर्षात पर्जन्यमान समाधानकारक
Advertisement

विविध पंचांगांनी वर्तविले अंदाज

Advertisement

  • महाराष्ट्रात 10 जूननंतर मान्सूनचा प्रवेश
  • 22 जून ते 10 ऑगस्ट काळात मुबलक पाऊस
  • 10 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर काळात पर्जन्यमान मध्यम
  • 20 सप्टेंबरपर्यंत पावसाला ओढ असेल
  • 20 ऑक्टोबरपर्यंत मध्यम पाऊस

बेळगाव : भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि बळीराजा म्हणजेच शेतकरी या देशाचा कणा आहे. शेतकरी धान्य पिकवितात, त्यामुळे आपल्याला अन्नधान्य मिळते. पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्यांच्यामुळे अर्थचक्र गतिमान राहते. मात्र, हा बळीराजा पूर्णत: पाऊस आणि हवामान यावर सतत लक्ष ठेवून असतो. पाऊस पाणी पुरेसे झाले तर अन्नधान्यही भरघोस प्रमाणात येते. त्यामुळे पर्जन्यमान जाणून घेणे त्याला आवश्यक वाटते. नववर्षात पर्जन्यमान समाधानकारक असणार आहे, असा अंदाज विविध पंचागकर्त्यांनी वर्तविला आहे. बळीराजासाठी ही शुभवार्ता आहे. गुढीपाडव्यापासून सुरू होणाऱ्या नववर्षाच्या निमित्ताने पर्जन्यमान कसे असेल, याची त्याला उत्सुकता असते. त्यामुळेच वर्षारंभी पंचांगकर्ते काय म्हणतात, हे जाणून घेणे आवश्यक ठरते. शतक पूर्ण केलेल्या दाते पंचांगामध्ये दरवर्षी पर्जन्यमान नमूद करण्यात येते. हवामान आणि पर्जन्यमान यांचा हा विचार शेतकऱ्यांसाठी साहाय्यभूत ठरतो. त्यानुसार नक्षत्रनिहाय पर्जन्यमान कसे असेल, हे पाहणे आवश्यक आहे. पंचांगकर्त्यांनुसार शके 1946 चैत्र शुद्ध 1 मंगळवार, 9 एप्रिल रोजी नूतन क्रोधी संवत्सर सुरू होत आहे. वर्षप्रवेश कुंडलीमध्ये धनू लग्न उदित असून वरुण मंडल योग होत आहे. मेष प्रवेश कुंडलित वृश्चिक लग्न उदित असून अग्नी मंडल योग होत आहे. 10 एप्रिलची मंगळ-शनी युती, 11 एप्रिलची ऋतू उत्तेजक रवी-बुध युती, 19 एप्रिलची बुध-शुक्र युती आणि 18 मे ची रवी-गुरु युती व ग्रहमानाचा विचार करता एप्रिल व मेमध्ये उष्णतापमान वाढणार आहे.

नक्षत्रानुसार पर्जन्यमान

Advertisement

मृग नक्षत्र : 7 जून 2024 रोजी शुक्रवारी उत्तररात्री 1 वाजून 7 मिनिटांनी सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करीत आहे. त्यावेळी कुंभ लग्न अग्नी मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असून फक्त शनी नीर नाडीत आहे. 4 जूनची रवी-शुक्र युती व बुध-गुरु युती तसेच 14 जूनची रवी-बुध युती व 17 जूनची बुध-शुक्र युती यांचा विचार करता या नक्षत्राच्या उत्तरार्धात चांगल्या पावसाची सुरुवात होईल. वादळे होतील. दि. 9 ते 13 व 16 ते 18 पाऊस अपेक्षित आहे.

आर्द्रा नक्षत्र

दि. 21 जून रोजी शुक्रवारी रात्री 12 वाजून 6 मिनिटांनी सूर्याचे आर्द्रा नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळी कुंभ लग्न उदित असून अग्नी मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक मोर असून फक्त शनी नीर नाडीत आहे. 17 जूनला झालेल्या बुध-शुक्र युतीचा परिणाम या नक्षत्राच्या पावसावर होणार असून या नक्षत्राचा पाऊस बऱ्यापैकी व सर्वत्र होईल. दि. 24 जून ते 28 जुलै या दरम्यान 3 ते 4 वेळा पाऊस अपेक्षित आहे.

पुनर्वसू नक्षत्र

दि. 5 जुलै रोजी शुक्रवारी रात्री 11.40 वाजता सूर्य पुनर्वसू नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेशसमयी मीन लग्न असून वरुण मंडल योग आहे. पर्जन्यसूचक हत्ती हे वाहन असून बुध व शनी हे जल नाडीत आहेत. एकंदरीत ग्रहमान पाहता या नक्षत्रात पर्जन्यमान चांगले असेल. काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा येथे मोठी पर्जन्यवृष्टी संभवते. दि. 6 ते 11, 15, 16, 17 पाऊस अपेक्षित आहे.

पुष्य नक्षत्र

दि. 19 जुलै रोजी शुक्रवारी रात्री 11 वाजून 11 मिनिटांनी सूर्य पुष्य नक्षत्रात प्रवेश करीत असून त्या वेळेस मीन लग्न आणि वरुण मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक बेडूक असून रवि, बुध, शुक्र व शनि हे जल नाडीत आहेत. या नक्षत्रात पाऊस चांगला पडेल. पूर, अतिवृष्टीची शक्यता आहे. दि. 21 ते 25, 30, 31 ला पाऊस अपेक्षित आहे.

आश्लेषा नक्षत्र

दि. 2 ऑगस्ट रोजी शुक्रवारी रात्री 10.06 वाजता सूर्याचे आश्लेषा नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळी मीन लग्न उदित असून वरुण मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन गाढव असून रवि, बुध, शुक्र व शनि हे जल नाडीत आहेत. 8 ऑगस्टची बुध, शुक्र युती व ग्रहमान पाहता या नक्षत्राच्या पूर्वार्धात बऱ्यापैकी पर्जन्यवृष्टी होईल. उत्तरार्धात पाऊस खंडित होईल. एकंदरीत या नक्षत्रात पर्जन्यमान मध्यम राहील. दि. 2 ते 7, 12, 13, 14 पाऊस अपेक्षित आहे.

मघा नक्षत्र

दि. 16 ऑगस्ट शुक्रवारी रात्री 7.44 वाजता सूर्य मघा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेशसमयी कुंभ लग्न असून वरुण मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा आहे आणि रवि, बुध, शुक्र व शनि जल नाडीत आहेत. 14 ऑगस्टची मंगळ-गुरु युती, 19 ऑगस्टची रवि-बुध युती आणि शुक्र-शनि प्रतियुतीचा विचार करता या नक्षत्रात खंडित वृष्टीचे योग आहेत. पाऊस हुलकावण्या देईल. काही भागात जोरदार सरी होतील तर काही भागात पाऊस ओढ धरेल. दि. 17 ते 20, 24, 25, 28, 29 रोजी पाऊस अपेक्षित आहे.

पूर्वा नक्षत्र

दि. 30 ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुपारी 3.46 वाजता सूर्याचे पूर्वा नक्षत्र सुरू होत आहे. यावेळी धनु लग्न आणि वरुण मंडल योग आहे. उंदीर हे वाहन असून रवि, बुध, शुक्र, शनि हे जल नाडीत आहेत. 8 सप्टेंबरची रवि-शनि प्रतियुती व ग्रहमानाचा विचार करता या नक्षत्रात पर्जन्यमान मध्यम राहील. दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा या प्रदेशात बऱ्यापैकी पाऊस पडेल. ऑगस्ट 30, 31, सप्टेंबर 2, 3, 6, 7, 8 पाऊस अपेक्षित आहे.

उत्तरा नक्षत्र

दि. 13 सप्टेंबर रोजी शुक्रवारी सकाळी 9.35 वाजता सूर्य उत्तरा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेशसमयी तूळ लग्न असून वायू मंडल योग आहे. पर्जन्यसूचक हत्ती हे वाहन असून रवि, बुध, शनि हे जल नाडीत आहेत. 18 सप्टेंबरची बुध-शनि प्रतियुती व ग्रहमान पाहता या नक्षत्रात पाऊस ओढ धरेल. मात्र, पर्जन्यछायेच्या प्रदेशात थोड्या पावसाची शक्यता आहे. दि. 13, 14, 15, 23, 24, 25 पाऊस अपेक्षित आहे.

हस्त नक्षत्र

दि. 26 सप्टेंबर रोजी गुरुवारी उत्तररात्री 1 वाजून 10 मिनिटांनी सूर्याचे हस्त नक्षत्र सुरू होत असून त्यावेळी मिथून लग्न आणि वायू मंडल योग आहे. या नक्षत्राचे पर्जन्यसूचक मोर हे वाहन असून बुध व शनि नीर नाडीत आहेत. 30 सप्टेंबरच्या ऋतूउत्तेजक रवि-बुध युतीमुळे उष्णतामान वाढेल आणि दक्षिणेकडील प्रदेशात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल. काही भागात नुकसान होईल. सप्टेंबर 27 ते 30, ऑक्टोबर 2, 3 पाऊस अपेक्षित आहे.

चित्रा नक्षत्र

दि. 10 ऑक्टोबर रोजी गुरुवारी दुपारी 2 वाजून 6 मिनिटांनी सूर्य चित्रा नक्षत्रात प्रवेश करीत आहे. प्रवेशसमयी मकर लग्न असून इंद्र मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन पर्जन्यसूचक म्हैस असून मंगळ व शनि जल नाडीत आहेत. या नक्षत्रात परतीचा पाऊस साथ देईल. मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्र, मराठवाडा या भागात बऱ्यापैकी पाऊस होईल. सरासरी भरून काढण्यास मदत होईल. दि. 10, 11, 14, 15, 21, 22 रोजी पाऊस अपेक्षित आहे.

स्वाती नक्षत्र

दि. 23 ऑक्टोबर रोजी बुधवारी रात्री 12.42 वाजता सूर्याचे स्वाती नक्षत्र सुरू होत आहे. त्यावेळी कर्क लग्न उदित असून अग्नि मंडल योग आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असून मंगळ व शनि जल नाडीत आहेत. या नक्षत्राच्या पूर्वार्धात मध्यम वृष्टीचे योग असून खंडित वृष्टी होईल. पाऊस हुलकावण्या देईल. नक्षत्राच्या उत्तरार्धात बऱ्यापैकी पाऊस अपेक्षित आहे. दि. 24 ते 28 नोव्हेंबरनंतर पाऊस अपेक्षित आहे.

कोल्हापूर लाटकर पंचांग

24 मे नंतर वारे वाहतील, वावटळ येईल, पहिल्या चरणात सरी पडतील, गडगडाट होईल पण वळीवाचे प्रमाण कमीच असेल. मृग नक्षत्रामध्ये दक्षिण-पश्चिम भागात जोरदार सरी तर काही ठिकाणी ढगफुटी होईल, असा अंदाज या पंचांगाने व्यक्त केला आहे. आर्द्राच्या चौथ्या चरणात सर्वत्र पाऊस पडेल पण तिसऱ्या चरणात ओढ बसेल. पुनर्वसू नक्षत्रात ढगाळ हवामान राहील. पाऊस बऱ्यापैकी येईल. धरणे व जलाशयात पाणीसाठा होईल. पुष्य नक्षत्रामध्ये वाहन बेडूक असल्याने नद्या, धरणांमध्ये पुरेसे पाणी असेल. दक्षिण भागात अतिवृष्टी होईल. पीक व चारा-पाणी यांची स्थिती बरी राहील, असा अंदाज व्यक्त केला आहे. आश्लेषामध्ये मध्यम व हलक्या सरी येतील. पिकांना पाऊस कमी पडेल. एकंदरीत पर्जन्यमान कमी असेल. मघामध्ये एखाद्या साथीचा प्रादुर्भाव उद्भवेल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पाऊस उत्तरेकडे सरकेल व चाऱ्याची टंचाई भासेल. पूर्वा नक्षत्रात उत्तर इशान्य भागात अतिवृष्टी तर दक्षिण भागात पाणी टंचाई भासण्याची शक्यता वर्तविली आहे. उत्तरा नक्षत्रामध्ये पावसाचे प्रमाण चांगले आहे. पिके तरारतील तर चित्रामध्ये पर्जन्यमान बरे असल्याने एखाद्या ठिकाणची पाण्याची टंचाई भरून निघेल. दक्षिण भागात पाऊस परतीच्या वाटेवर असेल. स्वाती नक्षत्रामध्ये हवामानात वारंवार बदल होतील. उत्तरेकडे सरी पडतील. हळूहळू पर्जन्यमान कमी होऊन 15 नोव्हेंबरनंतर थंडी सुरू होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पंचांगांनुसार मधल्या नक्षत्रातील पर्जन्यावर जलाशये, धरणे अवलंबून असतील. पिकांचे मान 65 टक्के असेल. रब्बी पिके बरी असतील. कमी पाण्याच्या शेतीवर जोर द्यावा लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रुईकर पंचांगानेसुद्धा थोड्याफार याच तऱ्हेने अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, आर्द्रा नक्षत्रामध्ये बेळगाव, निपाणी, सांगली, कोल्हापूर, मिरज, कराड, सातारा, पुणे, दक्षिण महाराष्ट्र येथे पाऊस चांगला पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. एकूणच पंचांगांनुसार यंदा पर्जन्यमान समाधानकारक असेल, अशी आशा करण्यास हरकत नाही.

केरळमध्ये 1 ते 4 जूनमध्ये मान्सूनचे आगमन

केरळमध्ये मान्सूनचे आगमन 1 ते 4 जूनमध्ये वेळेवर होईल. मात्र, महाराष्ट्रात 10 जूननंतर मान्सून प्रवेश करील.  22 जून ते 10 ऑगस्ट या काळात मुबलक पाऊस होईल. काही भागात जनजीवन विस्कळीत होईल. 10 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या काळात पर्जन्यमान मध्यम असेल. 20 सप्टेंबरपर्यंत पाऊस ओढ धरून वृष्टी खंडित होईल. पुन्हा पाऊस सक्रिय होऊन 20 ऑक्टोबरपर्यंत मध्यम पाऊस पडेल व सरासरी भरून निघेल इतका होईल. 1 ते 15 नोव्हेंबरपर्यंत पाऊस अपेक्षित आहे. एकंदरीत आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, हस्त व चित्रा नक्षत्रांचा पाऊस समाधानकारक होईल.

Advertisement
Tags :

.