For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

यशस्वी भव..!

06:47 AM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
यशस्वी भव
Advertisement

टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाचा 15 जणांचा चमू जाहीर करण्यात आला असून, संघाच्या नेतृत्वाची कमान पुन्हा एकदा हिटमॅन रोहित शर्माकडे सोपविण्यात आली आहे. झटपट क्रिकेटचे स्वऊप पाहता हा तेजतर्रार संघ कागदावर तरी सरसच म्हणता येईल. त्यामुळे या संघाकडून क्रिकेटप्रेमींच्या निश्चितच अपेक्षा असतील. वेस्ट इंडिज आणि अमेरिकेकडे यजमानपद असलेल्या या स्पर्धेला येत्या 1 जूनपासून सुऊवात होत आहे. त्यामुळे पुढचा महिनाभर क्रिकेटचा ज्वर टीपेला पोहोचलेला असेल. मुख्य म्हणजे भारतीय संघ या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी प्रबळ दावेदार मानला जातो. संघातील समतोलपणा पाहता भारतीयांकरिता ही सुवर्णसंधी नक्कीच उपलब्ध असेल. सलामीवीर म्हणून शुभमन गिलऐवजी यशस्वी जैस्वालला संधी देण्यात आली आहे. सौरभ गांगुली, गौतम गंभीर, शिखर धवननंतर यशस्वीच्या रूपाने भारताला प्रतिभावान डावखुरा सलामीवीर मिळणे, हा प्लस पॉईंट ठरावा. आक्रमकता, फटक्यांमधील विविधता ही त्याच्या खेळाची वैशिष्ट्यो आहेत. मागच्या काही दिवसांतील यशस्वीचा परफॉर्मन्सही चांगला राहिला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दोन खणखणीत द्विशतकांची नोंद करणाऱ्या या क्रिकेटपटूने आयपीएलमध्येही धडाकेबाज कामगिरी केली. आता रोहित शर्मासोबत तो डावाची सुऊवात करेल. त्यातून जुळून येणारे राईट अँड लेफ्ट कॉम्बिनेशन संघासाठी फायदेशीर ठरू शकेल. तसा सलामीवीर शुभमन गिलला राखीव खेळाडूमध्ये बसविण्याचा निर्णय कठोरच म्हणावा लागेल. मात्र, क्रिकेटमधील प्रचंड स्पर्धेच्या या युगात फॉर्म हरवत असेल, तर हे स्वाभाविकच ठरते. वन डाऊनसाठी पुन्हा विराट कोहली हाच पर्याय असू शकतो. यंदाचा आयपीएलचा मोसमही या क्लासिकल फलंदाजाने आपल्या शैलीने गाजविला आहे. त्याचा शतकी अंदाज बरेच काही सांगून जातो. याखेपेसही वर्ल्ड कपमध्येही त्याच्याकडून अशाच खेळाची अपेक्षा असेल. टी ट्वेंटी प्रकारासाठी सूर्यकुमार यादव हा परफेक्ट फलंदाज मानला जातो. तो दुखापतीतून सावरणे, ही भारतासाठी सकारात्मक बाब ठरावी. सूर्यानेही आयपीएलमध्ये दमदार फलंदाजी करून आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले आहे. त्याच्यात एकहाती सामना फिरविण्याची क्षमता आहे. त्यामुळे सूर्या किती तळपतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. अष्टपैलू हार्दिक पंड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबई संघाचे कर्णधारपद सांभाळणाऱ्या हार्दिकला आयपीएलमध्ये फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. तरीही फॉर्मशी झगडणाऱ्या हार्दिकवर विश्वास टाकण्यात आला आहे. त्यामुळे वर्ल्ड कपमध्ये त्याच्यावर दडपण असेल. ते झुगारून त्याला चांगला खेळ करावा लागेल. त्याच्या जोडीला शिवम दुबेलाही घेण्यात आले आहे. चेन्नईकडून खेळणाऱ्या शिवमने आत्तापर्यंत दमदार प्रदर्शन केले आहे. त्यामुळे त्याच्या वर्ल्ड कप एन्ट्रीकडे लक्ष असेल. तर अक्षर पटेलला तिसरा ऑल राऊंडर म्हणून घेण्यात आले आहे.. याशिवाय रवींद्र जडेजा हाही संघात आहेच. भरवशाचा फलंदाज व गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिले जाते. सामना फिरविण्याची त्याची क्षमता पाहता तो संघात असणे ही जमेची बाजू ठरते. जीवघेण्या अपघातामुळे क्रिकेटपासून अनेक दिवस दूर असलेला यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याची संघवापसी टीमला बळकटी देणारी ठरावी. पंत आयपीएलमध्ये चांगला खेळला आहे. आपल्या जिद्दीचे दर्शन तो वर्ल्ड कप सामन्यातही घडविणार का, हे पहावे लागेल. त्याच्या जोडीला राजस्थान रॉयलचा कर्णधार संजू सॅमसनचीही संघात निवड झाली आहे. सॅमसन मागच्या काही दिवसांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करीत आला आहे. परंतु, त्याला संधी मिळत नव्हती. यष्टीरक्षक, फलंदाज अशा दोन्ही आघाड्यांवर यशस्वी ठरणाऱ्या संजूसाठी हा वर्ल्ड कप नक्कीच महत्त्वाचा असेल. भारताचे ब्रम्हास्त्र असलेल्या जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराजकडे वेगवान गोलंदाजीची धुरा असेल. बुमराहकडे अचूक टप्पा आहे. तसेच यॉर्करसारखे हुकमी अस्त्र आहे. त्याच्यापुढे फलंदाजांचा कस लागू शकतो. सिराजकडे चांगला वेग असला, तरी टप्प्यावर त्याला नियंत्रण ठेवावे लागेल. योग्य लाईन अँड लेंथ ठेवली, तर त्याच्यापुढे प्रतिस्पर्ध्याचा कस लागेल. मागच्या काही दिवसांपासून धारदार गोलंदाजी करणाऱ्या अर्शदीपवरही विश्वास दाखविण्यात आला आहे. त्याच्याकडे स्विंग आहे. परदेशी खेळपट्ट्यावर स्विंग निर्णायक ठरतो, हे लक्षात घेतले पाहिजे. फिरकी गोलंदाजीची कमान कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल यांच्याकडे असेल. दोघेही तोडीस तोड आहेत. अमेरिका व वेस्ट इंडिजमधील आत्ताची खेळपट्टी वेगळी आहे. काहीशी स्लो आहे. तेथे असे दोन गोलंदाज प्रतिस्पर्धी फलंदाजांना नाचवू शकतात. याशिवाय शुभमनसह रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद हे राखीव खेळाडू असतील. मुख्य 15 जणांमधील कुणी जखमी झाले, तरच यापैकी कुणाला संधी मिळू शकते. आवेश खान, खलीलही गोलंदाज म्हणून जोरदार कामगिरी करत आहेत. रिंकू सिंगही धोकादायक फलंदाज आहे. आयपीएलमध्ये या खेपेला त्याला फार संधी मिळालीच नाही. त्यामुळेच राखीवमध्ये त्याला ठेवले असावे. दुसरीकडे के. एल. राहुलला मात्र संघातून वगळण्यात आले आहे. ऋतुराजलाही संधी मिळालेली नाही. आयपीएलच्या माध्यमातून सध्या अनेक खेळाडू पुढे येत आहेत. दर्जेदार खेळाडूंचा विचार केला, तरी देशात दोन ते तीन चांगले संघ तयार होऊ शकतात. या पार्श्वभूमीवर वर्ल्ड कपसाठी बेस्ट संघ निवडण्याचा प्रयत्न निवड समितीने केलेला दिसतो. रोहित शर्मा याने कर्णधार व फलंदाज अशा दोन्ही आघाड्यांवर आपले कर्तृत्व दाखवून दिले आहे. त्याच्या फलंदाजीबाबत प्रतिस्पर्ध्यांमध्ये एक दहशत दिसते. वर्ल्ड कपमध्ये रोहित फॉर्मात आला, तर त्याला रोखणे अवघड असेल. विराट कोहली हा जगातला सर्वांत टॉप फलंदाज मानला जातो. त्याचे तंत्र अचूक आहे. रोहित, कोहली आणि अन्य शिलेदारांनी किल्ला लढविला, तर भारत वर्ल्ड कपमध्ये नक्कीच यशस्वी होऊ शकतो. वनडेमध्ये विश्व करंडक जिंकण्याची भारताची संधी थोडक्यात हुकली. ती टी 20 मध्ये टीम इंडियाने साधावी, अशीच देशातील समस्त क्रिकेटप्रेमींची इच्छा असेल. त्यासाठी यशस्वी भव!

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.