महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारतीय क्रिकेटला अच्छे दिन आलेत!

06:53 AM Jul 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

हा लेख लिहीत असताना मला सचिन तेंडुलकरचे गुऊ कै. रमाकांत आचरेकर सरांची आठवण झाली. सचिनच्या 101 व्या कसोटी सामन्याच्या निमित्ताने मी त्यांची मुलाखत घेतली होती त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले होते की, क्रिकेटमध्ये धीर (पेशंस) ठेवल्यास विजय तुमच्या मुठीत असतो. नेमकं काल तेच चित्र भारतीय संघाच्या बाबतीत आपल्याला बघायला मिळालं. सर्व ठिकाणी कशी दिवाळी साजरी झाली आपण पाहिलं. चायवाल्यापासून ते रिक्षावाल्यापर्यंत सगळेच कसे खुश झालेत. एकंदरीत काय आता भारतीय संघाला अच्छे दिन आलेत असेच म्हणावे लागेल. या विजयानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाले की, त्यांनी फक्त विश्वचषकच जिंकला नाही तर 140 कोटी जनतेचं हृदय जिंकलंय. कालच्या सामन्याचा ‘ट्रिगर पॉईंट’ म्हणजे सूर्यकुमार यादवचा तो अफलातून घेतलेला झेल. या पूर्ण स्पर्धेत भारताचे क्षेत्ररक्षण अव्वल दर्जाचे राहिलं. कालच्या झेलानी त्यावर शिक्कामोर्तबही केलं. या झेलाने अक्षर पटेलचा तो झेल जॅकपॉट नव्हता हेही सिद्ध झालं.

Advertisement

काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षणाच्या नावाने बोंबच होती. काही चांगले फलंदाज क्षेत्ररक्षणात कच्चे असल्यामुळे त्यांना नेमकं कुठे लपवायचं हा यक्षप्रश्न कर्णधारासमोर असायचा. उदाहरण द्यायचं झालं तर संदीप पाटील. ज्याने इंग्लंडच्या बॉब विलीसला एका षटकात सहा चौकार ठोकले होते, त्याच संदीप पाटीलला नेमकं कुठं उभं करायचं हा प्रश्न पडायचा. गोलंदाजीत व्यंकटपती राजू तर 1980 च्या दशकात दिलीप दोशी या गोलंदाजाचा थ्रो तर यष्टिरक्षकाकडे येईपर्यंत तर पाकिस्तानचे त्याकाळचे फलंदाज दोन, दोन धावा पूर्ण करायचे. परंतु मागील काही वर्षात भारताने टाकलेली क्षेत्ररक्षणातील कात निश्चित लक्षवेधी आहे. अर्थात याचं पूर्ण श्रेय टी.राजा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना द्यावेच लागेल.

Advertisement

कालच्या लेखात नियतीने न्याय केलाय या शीर्षकाखाली आपण उहापोह केला होता. त्याच नियतीने काल राहुल द्रविड यांनाही न्याय दिला. 2007 मधील विश्वचषक स्पर्धेत राहुल द्रविडच्या नेतृत्वात भारतीय संघ वेस्टइंडीजमध्ये दाखल झाला होता. त्या स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात त्यावेळच्या नवख्या बांगलादेशविऊद्ध भारतीय संघाचा डाव 190 धावावर आटोपला होता. अर्थात या धावसंख्येच्या पाठलाग बांगलादेशने व्यवस्थित केला. या पराभवामुळे भारतीय संघ प्राथमिक फेरीतच स्पर्धेबाहेर गेला. परंतु या पराभवाला सामोरं जावं लागलं ते राहुल द्रविडला. भारतीय क्रिकेटरसिकांचा त्यांना बराच रोष पत्करावा लागला. परंतु तब्बल 17 वर्षानंतर भारतीय संघाने विंडीजमध्ये विश्वविजेतेपद पटकावले. त्यात लाखमोलाचा वाटा आहे तो प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा. भारतीय संघाने  विश्वचषकाच्या रूपात राहुल द्रविड यांना गुऊदक्षिणाच दिली. भारतीय संघाने त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या शेवटच्या सामन्यात निराश केले नाही. क्रिकेट हा सभ्य माणसांचा खेळ आहे. त्यातच राहुल द्रविडसारखा सभ्य व्यक्ती पूर्ण जोमाने भारतीय संघाला प्रोत्साहित करत होता. भारतात क्रिकेटला धर्म म्हणून पूजलं जातं. त्याच धर्माला काल-परवा भारतीय संघ जागला.

दोन विश्वचषकात मातीच्या रूपात दोन वेगवेगळी दृश्ये बघायला मिळाली. 1983 मध्ये लॉर्ड्सवर भारताकडून विंडीज संघ पराभूत झाला म्हणून माल्कम मार्शलने हताशापोटी माती खाल्ली तर काल विंडीजमध्ये जिथे रोहितने तिरंगा झेंडा रोवला होता त्या जागेवरची माती अभिमानाने चाखली. माती तीच परंतु जिंकल्यानंतर आणि पराभव झाल्यानंतर मातीची चव काय असते ते क्रिकेटने दाखवून दिले. काल क्षणभर मला अहमदाबादच्या त्या सामन्याची आठवण झाली, पुन्हा अंगावर जखमा होणार, या विचारातून मन अगदी कासावीस झालं होतं. परंतु पुन्हा एकदा बुमराहऊपी मलमाने 140 कोटी भारतीयांच्या संभाव्य जखमा दूर केल्या. क्रिकेटच्या खेळामधून लाखो ऊपये मिळवणाऱ्या खेळाडूंना ते सुख किंवा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता, ज्याची ते मागील एक वर्षापासून अपेक्षा करत होते. शेवटी प्रतीक्षा संपली. ते सुख त्यांना मिळालंच. शेवटी युद्धात आणि खेळात ‘जो जीता वही सिकंदर’ असं म्हटलं जातं. अर्थात हे सिकंदर, ‘मुकद्दर का सिकंदर’ होतं का हे येणारा काळच ठरवणार आहे. तूर्तास तरी भारतीय संघाचे अभिनंदन. दैनिक तऊण भारत संवाद वर्तमानपत्राच्या वाचकांनी व्हाट्सअॅप मेसेज, फेसबुक आणि वैयक्तिक फोन करून मला प्रोत्साहित केल्याबद्दल तमाम वाचकांचे जाहीर आभार. धन्यवाद!

 

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article