कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गोंगाडी त्रिशा...एक अफलातून कथा !

10:35 AM Feb 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारताच्या 19 वर्षांखालील मुलींच्या संघानं नुकताच या वयोगटातील ‘टी-20’ विश्वचषक सलग दुसऱ्यांदा जिंकून इतिहास घडविलाय...या जबरदस्त कामगिरीस साऱ्याच खेळाडूंचा हातभार लागलेला असला, तरी त्यात विशेष उठून दिसली ती आपल्या अष्टपैलू कामगिरीनं ठसा उमटविणारी गोंगाडी त्रिशा...हैदराबादच्या या मुलीनं लहान वयातच क्रिकेटच्या विश्वात घेतलेल्या झेपेची कहाणी ही अफलातून अशीच...अन् त्यामागं तितकेच श्रम लपलेत ते तिच्यासाठी झपाटल्यागत झटलेल्या वडिलांचे देखील...

Advertisement

भारतानं मलेशियाची राजधानी क्वालालंपूर इथं झालेल्या 19 वर्षांखालील मुलींच्या ‘टी-20’ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत तब्बल 52 चेंडू शिल्लक असतानाच दक्षिण आफ्रिकेचा फडशा पाडला अन् संपूर्ण स्पर्धेत एकही लढत न गमावता जगज्जेतेपद पटकावलं ते सलग दुसऱ्यांदा...त्यात एका मुलीचा वाटा फार मोठा आणि अपेक्षेप्रमाणं सामन्यातील व संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा मानही मिळाला तो तिलाच...तिच्या लेगस्पिननं अंतिम लढतीत 15 धावांत तिघांना गुंडाळलं अन् त्यानंतर 33 चेंडूंत नाबाद 44 धावाही हाणल्या... संपूर्ण स्पर्धेत त्या मुलीनं 77.25 धावांच्या सरासरीनं सात सामन्यांत एका शतकासह 309 धावा फटकावल्या अन् सात बळी खिशात घातले. 6 धावा देऊन तीन फलंदाजांना गारद करणं ही तिची सर्वोत्तम कामगिरी. 19 वर्षांखालील स्पर्धेत शतक झळकावणारी ती बनली पहिलीवहिली भारतीय मुलगी...अंतिम सामन्यापूर्वीच्या 10 डावांमध्ये तिनं 64.8 इतकी सरासरी नोंदविली ती दोन अर्धशतकं झळकावत आणि दोनदा 40 हून जास्त धावांची खेळी करत...हैदराबादची गोंगाडी त्रिशा...

Advertisement

त्रिशाच्या क्रिकेटमधील प्रवासाला प्रारंभ झाला तो खरं तर वयाच्या दुसऱ्याच वर्षी. जिम्नेशियममध्ये प्रशिक्षक म्हणून काम करणारे वडील जी. रामी रेड्डी यांनी तिला प्लास्टिकची बॅट घेऊन दिली अन् सुरुवात झाली ती एका विलक्षण मोहिमेला...ते तिला प्लास्टिक व मऊ टेनिसबॉल टाकायचे. त्रिशानं रीतसर धडे गिरविण्यास प्रारंभ केला तो वयाच्या चौथ्या वर्षी. रामी यांनी सराव करण्यासाठी खास सिमेंटची खेळपट्टीही बनविली. त्यावेळी ते प्रत्येक दिवशी किमान हजारभर चेंडू तिला खेळायला लावायचे...

म्हणूनच अंतिम सामन्यात भारतानं विजयाची नोंद केल्यानंतर त्रिशा म्हणाली, ‘माझ्याजवळ सांगायला शब्दच नाहीत. मी सर्व श्रेय वडिलांना देते. कारण त्यांच्याशिवाय इथपर्यंत पोहोचणंच शक्य नव्हतं. मला माझ्या देशासाठी भरपूर खेळायचंय अन् सामने जिंकून द्यायचेत’...अंतिम सामन्यासाठी क्वालालंपूर इथं आवर्जुन हजर राहिलेले तिचे वडील जी. रामी रेड्डी यांच्या मते, एखाद्या चेंडूच्या खेळात जास्तीत जास्त सराव करणं अतिशय महत्त्वाचं. त्यामुळं लहान असतानाच प्रारंभ केल्यास शरीराला अचूक खेळण्याची सवय लागते...

जी. रामी रेड्डींची वृत्ती ही खेळावर प्रचंड प्रेम करणारी. त्यांनी स्वत: हैदराबादच्या 16 वर्षांखालील हॉकी संघाचं प्रतिनिधीत्व करण्यात यश मिळविलं होतं. परंतु तेलंगणच्या राजधानीपासून 300 किलोमीटर अंतरावर असलेल्या भद्राचलम इथं राहावं लागणं साऱ्या स्वप्नांचा अक्षरश: चुराडा करून गेलं...या पार्श्वभूमीवर तिथं क्रिकेटच्या सुविधा अतिशय कमी असल्यानं त्रिशाच्या बाबतीत आपल्यासारखी परिस्थिती येऊ नये याकरिता त्यांनी सारी सूत्रं हातात घेतली ती स्वत:च्या. लवकर सुरुवात केल्यानं तिला पुढं ताण घेणंही सोपं झालं...त्रिशाच्या वडिलांनी तिच्यासाठी आहाराचं वेळापत्रकच तयार केलं आणि तिला भरपूर प्रोटिन्स मिळतील याची व्यवस्था केली. मात्र त्यात एखाद्या ‘सप्लिमेंट’चा समावेश नव्हता. कारण जेवणातील प्रत्येक पदार्थ घरीच तयार केलेला असायचा...

जी. रामी रेड्डी यांनी गोंगाडी त्रिशाला क्रिकेटपटू बनविण्याचं ध्यासच घेतला होता असं म्हटल्यास ते चुकीचं ठरणार नाहीये. कारण त्यांनी तिला शाळेत न पाठविता खासगी ‘ट्युशन्स’ची व्यवस्था केली...‘आम्ही जेव्हा तिला शाळेत दाखल केलं तेव्हाही ती फक्त तीन तासच जायची, तर दिवसातील सहा ते आठ तास फक्त क्रिकेट. जर आम्ही शालेय व्यवस्थेचं पालन करण्याचं ठरविलं असतं, तर तिला देशाच्या वतीनं खेळणं शक्यच झालं नसतं’, वडिलांचे शब्द...रेड्डींनी 11 वर्षांच्या त्रिशाला हैदराबादच्या प्रसिद्ध सेंट जॉन्स क्रिकेट अकादमीमध्ये भरती केलं त्यावेळी ती आजी-आजोबांसमवेत (आईचे पालक) राहायची. पण एके दिवशी तिला मैदानावर पोहोचविताना आजोबांना छोटासा अपघात झाल्यानं वडिलांनी निर्णय घेतला तो हैदराबाद इथं स्थलांतर करण्याचा. त्यासाठी त्यांनी नोकरीवर सुद्धा पाणी सोडलं...

व्ही. व्ही. एस. लक्ष्मण नि मिताली राजसारख्या खेळाडूंनी आकार घेतला तो सेंट जॉन्स अकादमीतच. तेथील प्रशिक्षक जॉन मनोज यांचं लक्ष गोंगाडी त्रिशाच्या ‘हँड-आय’ समन्वयानं वेधून घेण्यास फारसा वेळ लागला नाही...विशेष म्हणजे ती 8 वर्षांची असताना चक्क हैदराबादच्या 16 वर्षांखालील संघातून, तर 11 वर्षांची असताना 19 वर्षांखालील चमूतून खेळली. 23 वर्षांखालील संघाचं प्रतिनिधीत्व केलं तेव्हा ती अवघी 12 वर्षांची अन् वरिष्ठ संघातून खेळताना वय फक्त 13 वर्षांचं...सतत टेनिसबॉल हाणण्याचा सराव केल्यानं त्रिशाच्या फटक्यांतील जोर प्रचंड वाढला. शिवाय तिला आधार मिळाला तो बॅटवरील ‘टॉप हँड ग्रिप’चा...तिच्या कौशल्याचं वर्णन करण्यासाठी प्रशिक्षक जॉन मनोज म्हणतात, ‘सचिन तेंडुलकर 16 व्या वर्षीच देशातर्फे खेळण्यामागचं कारण म्हणजे तो इतरांपेक्षा वेगळा होता अन् ही मुलगी देखील तशीच’...

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम फेरीत त्रिशानं वेगळ्या शैलीनं घातलेल्या लेगस्पिननं हैदराबादचे प्रशिक्षक विद्युत जयसिंहा यांच्यावरही भुरळ टाकली, तर अकादमीतील तिच्या प्रगतीनं चकीत झालेल्या मितालीनं मनोज यांना तिच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्यास सांगितलंय...मजेशीर बाब म्हणजे महिलांच्या ‘प्रीमियर लीग’च्या लिलावात मात्र त्रिशा गोंगाडीकडे कुणी ढुंकूनही पाहिलं नव्हतं. आता ही परिस्थिती बदलेल हे सांगण्यास कुणा तज्ञाची गरज नाही !

- राजू प्रभू

 

अन्य महत्त्वाच्या शिलेदार...

जी. कमलिनी

तामिळनाडूच्या या डावखुऱ्या खेळाडूनं स्पर्धेत 47.66 च्या सरासरीनं एकूण 143 धावा जमविल्या अन् तिसरा क्रमांक मिळविला...कमलिनीचा विश्वचषकातील प्रारंभ अपेक्षेप्रमाणं झाला नव्हता. परंतु ‘सुपर सिक्स’ लढतींना सुरुवात झाली आणि बॅट पारजू लागली. त्यात समावेश स्कॉटलंडविरुद्धच्या 51 अन् उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध फटकावलेल्या नाबाद 56 धावांचा...येऊ घातलेल्या महिलांच्या ‘प्रीमियर लीग’साठी मुंबई इंडियन्सनं कमलिनीकरिता 1.6 कोटी रुपये ओतलेत. तिला ही संधी मिळाली ती 19 वर्षांखालील ‘आशिया चषक’ स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध 29 चेंडूंत 44 धावांची खेळी केल्यानंतर...कमलिनीला स्केटिंग अतिशय आवडायचं, पण भाऊ क्रिकेट खेळत असल्यानं तिनंही तीच दिशा पकडली. तिच्या आई-वडिलांनी सुद्धा मदुराईला ‘गूडबाय’ म्हणत चेन्नईत स्थलांतर केलं ते कमलिनीच्या कारकिर्दीचा विचार करूनच...

वैष्णवी शर्मा

ग्वाल्हेरची डावखुरी ‘ऑर्थोडोक्स’ गोलंदाज...तिनं स्पर्धेत एकूण 17 बळी खिशात घालून 19 वर्षांखालील मुलींच्या ‘टी-20’ विश्वचषक स्पर्धेत सर्वांत जास्त बळी मिळविण्याचा विक्रम नोंदविलाय...मलेशियाला फक्त 31 धावांत गुंडाळताना वैष्णवीनं हॅट्ट्रिकसह 5 धावांत 5 बळी घेतले. त्यानंतर श्रीलंकेविरुद्ध 3 धावांत 1, बांगलादेशबरोबर 15 धावांत 3, स्कॉटलंडविरुद्ध 5 धावांत 3, इंग्लंडसमवेत 23 धावांत 3, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 23 धावांत 2 अशी जबरदस्त कामगिरी...

आयुषी शुक्ला

तिनं मलेशियाविरुद्ध वैष्णवीला सुरेख साथ दिली. त्यानंतर स्कॉटलंडविरुद्ध 8 धावांत 4 बळी मिळविणाऱ्या आयुषीनं स्पर्धेतील सात सामन्यांत 14 बळी मिळविले...भारतानं स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली ती गोलंदाजांच्या भेदक कामगिरीच्या जोरावर अन् त्यात मोठा वाटा राहिला तो आयुषीच्या शुक्लाच्या फिरकी गोलंदाजीचा. कारण तिला तोंड देणं कुठल्याही प्रतिस्पर्ध्याला शक्य झालं नाही...

यांचाही वाटा मोलाचा...

सानिका चाळके

मुंबईच्या या तरुणीनं विजयी फटका लगावला तो मोनालिसा लेगोडीच्या गोलंदाजीवर आणि भारतानं सतत दुसऱ्यांदा चषक पटकावला...कर्णधार निकी प्रसादला उपकर्णधार सानिकानं परिपूर्ण साथ दिली. भारताच्या सलामीच्या फलंदाजांना तिनं मधल्या फळीत केलेल्या कामगिरीचा जबरदस्त आधार मिळाला...

पारुनिका सिसोदिया

भारतानं गोलंदाजीत अगदी शंभर टक्के वर्चस्व गाजविलं. परंतु त्यात फक्त वैष्णवी व आयुषीचा हात होता असं म्हणणं चुकीचं ठरेल...या ठिकाणी 10 बळी मिळवून आपलं काम चोखरीत्या बजावणाऱ्या पारुनिकाला विसरता येणार नाही. या डावखुऱ्या फिरकीपटूला महिलांच्या ‘प्रीमियर लीग’साठी गुजरात जायंट्सनं करारबद्ध केलंय. ती सर्वांत जास्त बळी मिळविणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत चौथ्या क्रमांकावर राहिली. पारुनिकानं उपांत्य सामन्यात 21 धावांत 3 फलंदाजांना, तर अंतिम फेरीत 6 धावांत 2 फलंदाजांना परतीची वाट दाखविली...

व्ही. जे. जोशिथा

केरळची जोशिथा म्हणजे भारताचं गोलंदाजीतील आणखी एक महत्त्वाचं अस्त्र. तिनं अचूक गोलंदाजीचं छान दर्शन घडवत सहा सामन्यांत सहा बळी मिळविले आणि षटकामागं 5 धावा सुद्धा दिल्या नाहीत...

शबनम शकील

विशाखापट्टणमच्या या 17 वर्षीय मुलीनं दक्षिण आफ्रिकेनं आयोजित केलेल्या नि भारतानं जिंकलेल्या यापूर्वीच्या विश्वचषक स्पर्धेतही सहभागी होण्याचा मान मिळविला होता. तिनं सात सामन्यांत 4 बळी मिळविले. जोशिथाप्रमाणं शबनमची सुद्धा अचूक गोलंदाजी हे प्रमुख हत्यार. त्याच्या जोरावरच तिनं बाजी मारली अन् षटकामागं दिल्या त्या 4 पेक्षा किंचित जास्त धावा...7 सामन्यांत 17 षटकं टाकलेल्या या मुलीची 9 धावांत 2 बळी ही सर्वोत्तम कामगिरी....

- राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article