गोनासिकाचा तुफान्सवर पेनल्टी शूटआऊटमध्ये विजय
अँडरसनचा सर्वात जलद गोल, 3-1 फरकाने यश
वृत्तसंस्था’ /राऊरकेला, ओडिशा
हॉकी इंडिया लीगच्या इतिहासात जेकब अँडरसनने सर्वात जलद गोल नोंदवला असला तरी पेनल्टी शूटआऊटमध्ये त्याचा संघ हैदराबाद तुफान्स टीम गोनासिकाकडून 1-3 असा पराभूत झाल्याने त्याचा विक्रम वाया गेला. त्याने सामना सुरू झाल्यानंतर 20 व्या सेकंदालाच गोल नोंदवला होता. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी 3-3 अशी बरोबरी साधली होती.
अँडरसनच्या सर्वात जलद गोलनंतर टिम ब्रँड (सहावे मिनिट), अमनदीप लाक्रा (25 वे मिनिट) यांनी टीम गोनासिकाने अन्य दोन गोल नोंदवले. गोनासिकातर्फे व्हिक्टर चार्लेटने (12 व 55 वे मिनिट) दोन तर अरायजीत सिंग हुंदालने 24 व्या मिनिटाला गोल नोंदवला.
सामना सुरू झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या अँडरसनने सर्वात जलद वेळेत गोल नोंदवून हैदराबादला तुफान्सला आघाडीवर नेले. बचावातील त्रुटीचा लाभ घेत अँडरसनने सर्कलमध्ये मुसंडी मारली आणि जोरदार फटक्यावर त्याने हा गोल नोंदवला. सहाव्या मिनिटाला टिम ब्रँडने त्यात आणखी एका गोलाची भर घालत ही आघाडी 2-0 अशी केली. मायको कॅसेलाने पुरविलेल्या पासवर त्याने हा गोल नोंदवला. बॉक्सजवळ आपल्याकडे पास येणार हे ताडून त्याने आपली स्टिक अचूक वेळेत पुढे करीत चेंडूला गोलची दिशा दिली.
12 व्या मिनिटाला गोनासिकाला बरोबरीची संधी मिळाली. यावेळी त्यांना पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि त्यावर चार्लेटने गोलरक्षक डॉमिनिक डिक्सनचा अंदाज चुकवत अचूक गोल नोंदवला. पहिल्या सत्रानंतर तुफान्सने 2-1 अशी आघाडी मिळविली होती. पण ही आघाडी जास्त वेळ टिकली नाही. दुसऱ्या सत्रात 24 व्या मिनिटाला गोनासिकाला आणखी एक पेनल्टी स्ट्रोक मिळाला आणि त्यावर अरायजीतने अचूक गोल करीत 2-2 अशी बरोबरी साधून दिली. पण पुढच्याच मिनिटाला अमनदीपने तुफान्सला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली.
तिसऱ्या सत्रात दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केला. पण कोणालाही गोल करता आला नाही. शेवटच्या सत्रात सामना 5 मिनिटे असताना चार्लेटने वैयक्तिक दुसरा गोल नोंदवत गोनासिकाला 3-3 अशी बरोबरी साधून दिली. पेनल्टी शूटआऊटमध्ये तुफान्सने आघाडी घेतली असली तरी ऑलिव्हर पेनने शानदार गोलरक्षण करीत तीन गोल वाचवत गोनासिकाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. तुफान्स दुसऱ्या स्थानावर असून उपांत्य फेरीतील स्थानासाठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.