भरदिवसाच्या घरफोडीने गोमेवाडी हादरली
आटपाडी :
गोमेवाडी (ता. आटपाडी) येथे भरदिवसा चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत तब्बल 14 तोळे सोने, 300 ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम, असा साडेसहा लाखाचा ऐवज लंपास झाला. मंगळवारी दुपारी मधुकर नारायण दबडे यांच्या राहत्या घरी ही घटना घडली.
गेमेवाडीतील व्यावसायिक मधुकर दबडे यांचे करगणी येथे पशुखाद्याचे दुकान आहे. ते मंगळवारी नेहमीप्रमाणे पशुखाद्याच्या दुकानात गेले होते. त्यांच्या कुटुंबातील सर्वजण दुपारी चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. ही संधी साधत चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेल्या ऐवजावर डल्ला मारला. चोरट्यांनी गंठण, टॉप्स, मिनी गंठण, झुमके व वेल, कॉईन, बदाम, 300 ग्रॅम चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा सुमारे साडेसहा लाखाचा ऐवज लंपास केला.
घरफोडीची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनय बहीर, सहायक निरीक्षक जाधव व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भरदिवसा घडलेल्या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे. मागील काही दिवसांपासून भरदिवसा चोरीच्या घटना घडत असून दिवस-रात्र पोलीसांनी गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.