For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभेत बनणार गोमंतकीयांचा आवाज

12:12 PM Jun 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभेत बनणार गोमंतकीयांचा आवाज
Advertisement

खासदार विरियाटो फर्नांडीस यांचे आश्वासन : आश्वासनांच्या पूर्ततेसाठी राहणार वचनबद्ध

Advertisement

पणजी : गोव्यातच आणखी एक गोवा लपलेला असून तेथे गरीबी, बेरोजगारी पाचवीला पूजलेली आहे. याचा प्रत्यय निवडणूक प्रचारादरम्यान दारोदारी फिरताना आला. हे चित्र आता आम्हाला बदलायचे आहे. त्यासाठीच जाहीरनाम्यात दिलेले प्रत्येक वचन पूर्ण करण्याचे प्रयत्न होतील, असे आश्वासन दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे उमेदवार विरियातो फर्नांडीस यांनी दिले. संपूर्ण कार्यकाळ आपण गोमंतकीयांचा आवाज बनून लोकसभेत वावरणार असल्याचे ते म्हणाले. मंगळवारी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर काल बुधवारी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित पहिल्याच पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅल्टन डिकॉस्टा, अॅड. कार्लुस फेरेरा, वेन्झी व्हिएगश, विजय सरदेसाई, तसेच आपचे प्रदेशाध्यक्ष अमित पालेकर, शिवसेनेचे जितेश कामत, माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा, एम. के. शेख, अविनाश, आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कॅप्टन फर्नांडीस यांनी हा विजय तमाम गोमंतकीयांचा आहे, लोकशाहीचा आहे, असे सांगितले. या विजयात योगदान दिलेले सर्वपक्षांचे नेते, कार्यकर्ते यांच्यासह तमाम मतदारांचेही आभार व्यक्त करत असल्याचे ते म्हणाले.

प्रकल्प रद्दतेसाठी प्रयत्न करणार 

Advertisement

प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी बोलताना, काँग्रेसने गोमंतकीयांच्या पसंतीचे उमेदवार दिले आणि त्यापैकी कॅप्टन फर्नांडीस यांची लोकांनी निवडही केली. जाहीरनाम्यात दिलेले खास करून पर्यावरण जतन आणि संवर्धनासंबंधी सर्व मुद्दे, म्हादईचा मुद्दा, कोळसा, त्रिस्तरीय प्रकल्प रद्द करणे, डबल ट्रेकिंग रद्द करणे, आदी सर्व मुद्दे पूर्ण करण्याचे प्रयत्न करण्यात येतील. असे सांगितले.

जनता भाजपला बळी पडली नाही

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी बोलताना भाजपने मतदारांवर प्रचंड दबाव टाकला होता. त्याशिवाय पैशांचा पाऊस पाडला होता. तरीही गोमंतकीय जनता त्यांना बळी पडली नाही आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली, असे  सांगितले. या निवडणुकीतून मिळालेले निकाल पाहता येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 30 पेक्षा जास्त जागा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपचे अस्तित्व लवकरच संपुष्टात

विजय सरदेसाई यांनी बोलताना, दक्षिण गोव्यातील लोकांनी केलेले मतदान हे फुटीरता आणि भ्रष्टाचार संपविण्यासाठी केलेले मतदान असल्याचे सांगितले. भाजप हा आता ’पार्टी विथ डिफरन्स’ हे बिऊद वापरण्यायोग्य पक्ष राहिलेला नाही. गोव्यातून त्यांचे अस्तित्व लवकरच संपुष्टात येईल, असे भाकितही त्यांनी केले.

भाजपची मानसिकता ढासळली 

अमित पालेकर यांनी बोलताना, देशातील एकुण निकाल व जनतेचा आपल्या बाजूने लागलेला कौल पाहून भाजपचे नेते बिथरले असल्याची टीका केली. एका बाजूने ते दक्षिण गोव्यातील पराभवाचे खापर धर्मगुरूंवर फोडत आहेत, तर दुसऱ्या बाजूने अयोध्येत बसलेल्या दणक्यासाठी हिंदूंवरही आरोप करू लागले आहेत. यावरून त्यांची मानसिकता ढासळली असल्याचे दिसून येते, असे पालेकर पुढे म्हणाले. जुझे फिलीप डिसोझा, जितेश कामत यांनीही यावेळी विचार मांडले.

Advertisement
Tags :

.