पाकिस्तानच्या मूळ गोमंतकीयास भारतीय नागरिकत्व बहाल
सीएए कायद्याच्या लाभाचा पहिला गोमंतकीय : तब्बल 11 वर्षे प्रतिक्षा
पणजी : भारतीय नागरिकत्व मिळविण्यासाठी तब्बल 11 वर्षे प्रतिक्षा केल्यानंतर अखेर जोझेफ परेरा या मूळ गोमंतकीयास भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले. केंद्र सरकारच्या ऐतिहासिक ठरलेल्या भारतीय नागरिकत्व सुधारणा (सीएए) कायद्यांतर्गत त्यांना या तरतुदीचा लाभ मिळाला आहे. असे नागरिकत्व मिळविणारे ते गोव्यातील नागरिक ठरले आहेत. मूळ कासावली येथील नागरिक असलेले परेरा यांनी गोव्यात पोर्तुगीज राजवट असताना 1961 मध्ये पाकिस्तानात स्थलांतर केले होते. त्यानंतर ते तेथेच स्थायिक झाले. त्यांनी पाकिस्तानचे नागरिकत्वही मिळविले.
सध्या ते 2014 पूर्वीपासून पत्नीसह गोव्यात राहात आहेत. त्यांचे आईवडील तसेच पत्नीही मूळ गोमंतकीय आहे. त्याच आधारे सीएए अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळविण्यास ते पात्र ठरले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. पेंद्र सरकारने सीएए कायद्यात केलेल्या दुऊस्तीनुसार 2014 पूर्वी शेजारील देशांमधून भारतात आलेल्या हिंदू, ख्रिस्ती, जैन, पारसी, सिंधी, बौद्ध, शीख यांना नागरिकत्व देण्याची तरतूद करण्यात आली आहे. याच तरतुदीचा परेरा यांना लाभ मिळाला आहे. बुधवारी सचिवालयात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र बहाल करून पत्नीसह त्यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी आम्ही यापुढेही सीएए अंतर्गत पात्र व्यक्तींना नागरिकत्व देणार आहोत, असे सांगितले.
स्वप्न साकार झाले : परेरा
त्यावेळी बोलताना परेरा यांनी मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांचेही आभार व्यक्त केले. भारतीय नागरिकत्व मिळाल्याने आपण अत्यंत समाधानी असून 11 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आपले स्वप्न साकार झाले असल्याचे उद्गार काढले. यावेळी ते बरेच भावनिक झाल्याचे दिसून आले.