For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काणकोणात आज - उद्या गोमंतक मराठी साहित्य संमेलन

12:27 PM Jan 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
काणकोणात आज   उद्या गोमंतक मराठी साहित्य संमेलन
Advertisement

आमोणे येथे आयोजन : विविध विषयांवरील परिसंवाद, कविसंमेलने, मान्यवरांचा सत्कार यांचा समावेश

Advertisement

काणकोण : गोमंतक साहित्य सेवक मंडळ आणि बलराम शिक्षणसंस्थेतफें आज दि. 13 आणि उद्या दि. 14 या दोन दिवसांत आमोणे, काणकोण येथील आदर्श ग्रामातील स्व. स. शं. देसाई साहित्य नगरात आयोजित करण्यात आलेल्या 29 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाची तयारी पूर्ण झाली असून संमेलनाचे स्वागताध्यक्ष असलेले सभापती रमेश तवडकर यांनी हे संमेलन संस्मरणीय होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. या समंलेनाची सकाळी 9 वा दिंडीने सुरुवात होणार असून 9.30 वा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ााहित्यिक सोनाली नवांगुळ या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी स्वागताध्यक्ष सभापती रमेश तवडकर, संमेलनाध्यक्ष डॉ. सोमनाथ कोमरपंत, पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, कार्याध्यक्ष सुनील पैंगणकर, गोमन्तक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, उपाध्यक्ष विठ्ठल गावस, कोषाध्यक्ष राजमोहन शेट्यो, सचिव किसन फडते उपस्थित राहणार आहेत. संमेलनाच्या उद्घाटनानंतर स्मरणिका प्रकाशन, सुवर्णपदक विजेत्यांचा गौरव, पुस्तकांचे प्रकाशन आणि मान्यवरांचा सत्कार होणार आहे. पहिल्या दिवशी सकाळच्या सत्रात ‘गोमंतकीय कथात्मक मराठी साहित्यातील ग्रामीण चित्रण’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रमदा देसाई असतील. त्यात प्रा. विनय बापट, प्रा. सारिका आडविलकर, प्रा. शुभलक्ष्मी ना. गावकर, आणि प्रा. तृप्ती फळदेसाई भाग घेणार आहेत. दुपारच्या सत्रात स्नेहा म्हांबरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘इंग्रजी आक्रमणामुळे प्रादेशिक भाषांचे भवितव्य’ या विषयावर होणाऱ्या परिसंवादात डॉ. विनय मडगावकर, मिलिंद माटे, शांताजी गावकर आणि मयुरेश वाटवे भाग घेणार आहेत. त्यानंतर गणे बाक्रे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलनात गोव्याच्या विविध भागांतील कवी, कवयित्री कविता सादर करणार आहेत. संध्याकाळी 5.15 वा. बाळकृष्ण मराठे हे कै. विष्णू वाघ यांच्या कवितांवर आधारित ‘विष्णुमय जग’ हा कार्यक्रम सादर करणार असून त्यानंतर सांस्कृतिक   कार्यक्रम होणार आहे.

उद्याचे कार्यक्रम

Advertisement

दि. 14 रोजी सकाळी 9.30 वा. राजू भिकारो नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ‘आज बालवाङमयाची उपेक्षा होते का ?’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात शीतल साळगावकर, रजनी रायकर, पुष्पा गायतोंडे आणि शर्मिला प्रभू भाग घेणार आहेत.   10.45 वा. साहित्यिक आणि विचारवंत गिरीश प्रभुणे यांची पत्रकार परेश प्रभू हे मुलाखत घेणार आहेत. त्यानंतर डॉ. अनिता तिळवे यांच्या अध्यक्षतेखाली ‘आम्ही   सावित्रीबाई, बहिणाबाईंच्या लेकी’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात         प्रा. पौर्णिमा केरकर, कालिका बापट, प्रा. दिप्ती फळदेसाई, प्रा. प्राची जोशी भाग घेतील. दुपारच्या सत्रात कविता बोरकर यांच्या अध्यक्षतेखाली नवोदित कवी, कवयित्रींचे कविता सादरीकरण होणार आहे. संध्याकाळी 4.30 वा. होणाऱ्या समारोप सोहळ्याला राज्यसभा खासदार सदानंद तानावडे उपस्थित राहणार आहेत. यावेळी सभापती रमेश तवडकर, डॉ. सोमनाथ कोमरपंत, साहित्य सेवक मंडळाचे पदाधिकारी, आयोजन समितीचे कार्याध्यक्ष सुनील पैंगणकर उपस्थित राहणार असून त्यानंतर संध्याकाळी 6 वा. भजन कलाकार स्व. पांडुरंग ना. गावकर यांच्या स्मृत्यर्थ संजीवन संगीत अकादमीचे विद्यार्थी भक्तिगीते, नाट्यागीते, भावगीताचा कार्यक्रम सादर करतील. या संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या गोव्यातील प्राथमिक ते उच्च प्राथमिक स्तरावरील  शिक्षकांना भरपगारी सुटी मिळणार असल्याचे परिपत्रक शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे यांनी जारी केले आहे. संमेलनाला उपस्थित राहणाऱ्या सभासदांना 100 रु. सभासद शुल्क लागू आहे. मात्र शालेय विद्यार्थ्यांना कसलीच फी आकारण्यात येणार नसल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

Advertisement
Tags :

.